ठाणे : राज्य शासनाने थिएटर आणि नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी अजूनही प्रेक्षकांची नाट्यगृहाकडे पावले वळली नसल्याने नाट्यगृहांचे भाडे केवळ २५ टक्केच घ्या अशी मागणी ज्येष्ठ रंगकर्मींनी केली होती. त्यानुसार आता कोरोनाची दुसरी लाट आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ५० टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरू करण्याचे प्रस्तावित करून त्यासाठी २५ टक्केच भाडे आकारले जाणार आहे. यापूर्वीदेखील ही सवलत दिली होती. तिला आता येत्या ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव ठामपाने येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
ठाणे महापालिकेच्या मालकीची गडकरी रंगायतन आणि डॉ. काशीनाथ घाणोकर ही दोन नाट्यगृहे असून, लॉकडाऊनच्या काळात ती बंदच होती. मात्र, आता नाट्यगृहे उघडण्याची परवानगी शासनाने दिल्याने दोन्ही नाट्यगृहे सुरू करण्यात येत आहेत. मात्र, केवळ ५० टक्के क्षमतेनेच ती सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने प्रेक्षकवर्ग मिळत नाही. त्यामुळेच भाड्यापोटी २५ टक्केच रक्कम आकारण्यात यावी, असे यापूर्वी झालेल्या ठरावात नमूद केले आहे. त्यानुसार हा प्रस्ताव १८ जूनच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला आहे.
......
चौकट - सद्य:स्थितीत गडकरी रंगायतनचे तिकीटमागे भाडे किमान ५० रुपये ते कमाल १५० रुपये आहे, तर घाणोकर नाट्यगृहाचे कमाल भाडे ५० ते १५० रुपये आहे. परंतु, सध्याची आर्थिक स्थिती पाहता नाट्यव्यवसाय सुरू राहावा व मराठी नाट्यसंस्था कार्यरत राहाव्यात या दृष्टिकोनातून दोन्ही नाट्यगृहांसाठी नाटकांचे कमाल दर ४०० पर्यंत मर्यादित ठेवण्यास व तिकीट दरापर्यंत मूळ भाडे २५ टक्क्के इतके आकारण्यास तसेच ज्यावेळेस तिकीट दर ४०० रुपयांपेक्षा जास्त आकारण्यात येईल त्यावेळेस नियमानुसार नियमित भाडे आकारण्यात येणार असल्याचे या अध्यादेशात स्पष्ट केले आहे.