मीरा रोड - सर्वांसाठी लोकलची दारे १ फेब्रुवारीपासून खुली झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली आहे. भाईंदर स्थानकातून पश्चिमेस बाहेर येणारा मुख्य पूल खुला केला आहे; परंतु पालिकेने केलेल्या सुशोभिकरणाच्या कामामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असल्याने बांधकाम तोडा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस ये-जा करणाऱ्या प्रवाशांची रोजची संख्या काही हजारांच्या घरात असताना महापालिकेने सत्ताधारी भाजपच्या आग्रहाखातर तब्बल आठ कोटी रुपये खर्चाचे सुशोभिकरणाचे कंत्राट देऊन काम सुरू केले. मुळात येथे आधीच जागा कमी असून, सार्वजनिक व खासगी बस, रिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड आहे; परंतु प्रवाशांच्या गैरसोयीचा आणि प्रत्यक्ष स्थितीचा कोणताच सारासार विचार न करता तब्बल आठ कोटी रुपयांचे सुशोभिकरण पालिकेने सुरू करून रस्त्याचा व रेल्वेचे जिने - तिकीट घर यांचा समतोल न राखताच पाच फुटांपेक्षा जास्त उंचीचा पाया बांधला आहे. त्यामुळे रेल्वेपुलावर तसेच तिकीट खिडकीकडे ये - जा करण्यासाठी प्रवाशांचे हाल होत आहेत. वृद्ध, महिला यांना तर हे जोखमीचे झाले आहे.या कामामुळे मधल्या जिन्याकडे ये - जा करण्यासाठीचा मार्गही चिंचोळा झाला असून, तेथे फेरीवाले आणि दुचाकीचे अतिक्रमण त्रासात भर घालत आहे. या बांधकामामुळे मुख्य रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल हाेत आहेत. महापालिकेने चालविलेले हे सुशोभिकरण नव्हे, तर लोकांचे हाल करणारे काम आहे. नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी केली जाते, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. हे काम बंद करायला लावले आहे; पण झालेले बांधकाम काढून नागरिकांसाठी रेल्वे परिसर मोकळा केला नाही तर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून बडतर्फ करण्यासाठी सरकारकडे तक्रार करू.- गीता जैन, आमदार सत्ताधारी भाजपने मनमानी करून नागरिकांचा छळ चालविला आहे. भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेरील हे बांधकाम हटवले नाही तर शिवसेना आंदोलन करेल.- कॅटलीन परेरा, माजी महापौर
रेल्वे प्रवाशांच्या मुळावर उठले महापालिकेचे सुशोभीकरण, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 1:14 AM