ठाणे : बी केबिन परिसरातील कृष्ण निवास इमारत दुर्घटनेनंतर आता ठाणे महापालिका खडबडून जागी झाली असून त्यांनी शहरातील अतिधोकादायक आणि धोकादायक इमारती खाली करण्याचा सपाटा लावला आहे. त्यानुसार, नौपाड्यातील ३ आणि राबोडीतील २ इमारती खाली करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यात पालिकेने नौपाड्यातील दोन इमारती सील केल्या असून राबोडीत मात्र रहिवासी इमारती खाली करण्यास तयार नसल्याने या भागात गुरुवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते. आम्हाला येथेच घर द्या, अशी मागणी या रहिवाशांनी केल्याने या कारवाईत अडथळे आले आहेत.पालिकेने नौपाड्यातील आई निवास ही ५८ वर्षे जुनी तळ अधिक दोन मजल्याची इमारत खाली केली आहे. या इमारतीत सात कुटुंबे वास्तव्यास होती. तसेच हरिनिवास सर्कल येथील यशवंत कुंज ही तळ अधिक तीन मजल्यांची इमारतही खाली केली असून या इमारतीत सुमारे ५० रहिवासी वास्तव्यास होते. या इमारतीला १९९९ मध्येच पालिकेने अतिधोकादायकची नोटीस बजावली होती. परंतु, इमारतीमधील रहिवाशांमध्ये काही अंतर्गत मतभेद असल्याने ही इमारत खाली केली नव्हती. अखेर, या दोन्ही इमारती पालिकेने सील केल्या आहेत. दरम्यान, आजी कृपा ही ५० वर्षे जुनी तळ अधिक तीन मजल्यांची इमारतही खाली करण्याची प्रक्रिया असून त्या ठिकाणी ५७ कुटुंबे राहत आहेत. त्यामध्ये सहा दुकानांच्या गाळ्यांचा समावेश आहे. राबोडीतही उथळसर प्रभाग समिती अंतर्गत असलेली गणेश ही रिकामी इमारतही सील करण्यात आली आहे. तसेच राबोडीतीलच करम आणि पगदाळू या दोन इमारती खाली करण्यासाठी प्रभाग समितीचे कर्मचारी आणि पोलीस यंत्रणा दिवसभर ताटकळत होती. करम ही इमारत तळ अधिक तीन मजल्यांची असून त्यात २६ कुटुंबांचे वास्तव्य आहे. तर पगदाळू ही इमारत तळ अधिक दोन मजल्यांची असून त्यामध्ये ३० कुटुंबांचे वास्तव्य असून या दोन्ही इमारती सुमारे ४५ वर्षे जुन्या आहेत. परंतु, रहिवाशांनी इमारत खाली करण्यास नकार दिला. त्यांना पर्यायही उपलब्ध करून देण्याची तयारी पालिकेने दाखवूनसुद्धा त्यांनी आम्हाला येथेच पर्याय द्या, असे सांगून इमारत खाली करण्यास नकार दिला. त्यामुळे या भागात काही काळ तणावाचे वातावरण होते. सायंकाळपर्यंत असेच वातावरण या परिसरात होते. (प्रतिनिधी)
अतिधोकादायक इमारती खाली करण्यासाठी पालिकेची धडपड
By admin | Published: August 06, 2015 11:37 PM