बदलापूर: उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यात बदलापूर नगरपालिका अपयशी ठरली होती. कोट्यवधीची भुयारी गटार योजनेचे काम करून सुद्धा आजही सांडपाणी हे थेट नदीत सोडण्यात येत आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी अमृत योजनेतून भुयारी गटाराच्या दुस-या टप्प्याचे काम पालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. या 34 कोटींच्या योजनेला पालिकेने मंजुरी दिली आहे.बदलापूर शहराचे सांडपाणी तीन वेगवेगळ्या ठिकाणी उल्हास नदीपात्रात सोडण्यात येते आहे. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला मात्र अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू नसलेला भुयारी गटार प्रकल्प कोटयवधींचे पैसे खर्चूनही अपूर्ण आहेत. यात 22 एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्रही उभारण्यात आले आहे. मात्र शहरातील भुयारी गटार वाहिन्यांना रहिवाशी सांडपाण्याच्या वाहिनी जोडल्या गेल्या नसल्याने अवघे 5 दशलक्ष लिटर्स ऐवढेच सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. जोडण्या पूर्ण न झाल्याने आजही विविध नाल्यातून उल्हास नदी पात्रात सांडपाणी जाऊन प्रदूषण होते आहे. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुळगाव बदलापूर नगरपालिकेला नोटीस पाठवली होती. त्यावर प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन देऊन पालिकेने वेळ मारून नेली.मात्र अद्यापही सांडपाणी नदीपात्रात सोडले जाते आहे. यावर उपाय म्हणून आता अतिरिक्त 70 कोटींच्या अमृत अभियानाच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. यात उल्हास नदीपात्रात सांडपाणी जाणा-या तीन ठिकाणी मुख्य सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळवले जाणार आहे. तर त्यातल्या दोन ठिकाणी छोटे प्रक्रिया प्रकल्पही उभारले जाणार आहेत.नदीत जाणारे हे सांडपाणी रोखण्यासाठी वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. मात्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून तपासणी झालेल्या या प्रकल्पासाठी 34 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत याविषयी चर्चा करण्यात आली होती. यासाठी सात ठिकाणच्या जागांचा विचार करण्यात आला असून त्या ताब्यात आल्या की कामाला सुरूवात होणार आहे. मात्र हे काम कधीर्पयत पूर्ण होणार याची निश्चिती पालिकेनेही दिलेली नाही. त्यामुळे ही योजना देखील आधीच्या योजनेप्रमाणो रखडणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
उल्हास नदीत जाणारे सांडपाणी थांबवण्याचा पालिकेचा प्रयत्न, अमृत अभियानात 34 कोटींच्या निधीला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 6:32 PM