लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : जागतिक महिला दिनी जन्मलेल्या मुलींना ठेव स्वरूपात एक लाख रुपये देण्याचा अनोखा उपक्रम महापालिकेने राबविल्याची माहिती महापौर लीलाबाई अशान यांनी दिली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.
तरण तलाव येथील सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्कार केला. पालिकेतर्फे महिला जन्मदिनी जन्मलेल्या मुलींच्या नावे मुदतठेव म्हणून एक लाख रुपये ठेवण्यात येणार आहे. यासाठी शहरातील रुग्णालयांना साेमवार, ८ मार्चला जन्मलेल्या मुलींची नावे महापालिका आरोग्य विभागाला देण्याचे आवाहन महापौरांनी केले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, वैद्यकीय अधिकारी दिलीप पगारे, डॉ. अनिता सपकाळे यांच्यावर जबाबदारी हाेती. महिला दिनाच्या कार्यक्रमात आज जन्मलेल्या मुलींची माहिती देण्यात आली. तसेच विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव केल्याची माहिती नगरसेवक व शिवसेनेचे उपशहरप्रमुख अरुण अशान यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रवादीने विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांचा गौरव पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात केला. यावेळी पक्षाचे गटनेता व सभागृहनेते भारत गंगोत्री, पक्ष शहराध्यक्ष किरण कौर धामी, नगरसेविका सुनीता बगाडे, माधव बगाडेंसह पदाधिकारी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीतर्फे शहराध्यक्ष शेषराव वाघमारे, प्रा. सुरेश सोनावणे, शहर संघटक प्रकाश शिरसाट यांनी शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विकास मतिमंद विद्यालयाच्या मुख्याध्यापक मंजूषा कांबळे व तीन एकर शेती व घर बुद्धविहारास दान करणाऱ्या सुनंदा तायडे यांचा सत्कार केला.