लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या मीरारोड येथील महापालिका रुग्णालयाची लिफ्ट गेले पाच दिवस बंद असल्यामुळे गर्भवती महिलांसह रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. रुग्णांना उचलून पहिल्या व दुसऱ्या मजल्यापर्यंत न्यावे व आणावे लागत आहे.
मीरा भाईंदर महापालिकेचे मीरारोडच्या पूनम सागर भागात भारतरत्न दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी रुग्णालय आहे. रुग्णालयाच्या तळ मजल्यावर अपघात विभाग, पहिल्या मजल्यावर ओपीडी, डायलिसिस, प्रसूतिगृह, पॅथॉलॉजी लॅब आहे. दुसऱ्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर, प्रसूतिगृह, गरोदर महिलांची ओपीडी आहे. महापालिकेच्या रुग्णालयात मोफत प्रसूती व उपचार होत असल्याने मोठ्या संख्येने गरजू महिला तसेच सर्वसामान्य रुग्ण पालिका रुग्णालयाचा लाभ घेण्यासाठी येतात. रुग्णालयाची इमारत असतानाही केवळ एकच लिफ्ट बसवण्यात आली आहे. सदर लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका खाजगी ठेकेदारास दिलेला आहे. मात्र गेल्या शनिवारपासून लिफ्ट बिघडल्याने बंद अवस्थेत आहे. लिफ्ट बंद असल्याने पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर चालत जाणे - खाली उतरणे गर्भवती महिला, डायलिसिसच्या रुग्णांसाठी अतिशय जिकिरीचे बनले आहे. जिने चढून जाणे रुग्णांना व गर्भवती महिलांना शक्य होत नाही.
रुग्णांना खुर्चीवर बसवून नेतात.. काही महिला व रुग्ण कसेबसे जिने चढून वर जातात. मात्र ज्यांना जिने चढणे अजिबात शक्य होत नाही त्यांना रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णांचे नातलग हे खुर्चीवर बसवून किंवा स्ट्रेचरने, चादरीत ठेवून पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर नेतात. अशा पद्धतीने गर्भवती महिला व रुग्णांना ने-आण करताना अपघाताची शक्यता असते.