लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: हद्दीचे क्षुल्लक कारण देत दोन दिवसांपूर्वी मानपाडयातील एका मृतदेहाचे तसेच तीन दिवसांपूर्वी आदिवासी पाडयातील अन्य एका मृतदेहाचेही शवविच्छेदन करण्याला ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयसाने नकार दिला होता. कोरोनासारख्या भयंकर साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयातून रुग्णांना उपचार तसेच शवविच्छेदनासाठी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोपरी पाचपाखाडी विधानसभा विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी पालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.आपल्या पत्रात कदम यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे गेल्या ४५ दिवसांपासून नागरिक घरातच आहेत. यातून अनेक जण त्रस्त आणि वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करीत आहेत. अशाच घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी येऊन पंचनामा करतात. मृत व्यक्तीला शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेतात. परंतू, हे रुग्णालय कोविड-१९ या रुग्णांसाठी असल्यामुळे पुन्हा पोलीस आणि नातेवाईक मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेतात. तिथेही हद्दीचे कारण दाखवित तसेच पालिका आयुक्तांच्या पत्राचा हवाला देत शवविच्छेदनाला नकार दिला जातो. मुळात, असे आदेश असतील तर त्याची प्रत उपलब्ध केली जावी. हद्दीचा मुद्दा असेल तर विटावा नाका ते आनंदनगर चेक नाका आणि थेट दिवा, मुंब्रा आणि लोकमान्यनगर अशी मोठी हद्द महापालिकेची आहे. संबंधित मृत व्यक्ती या मानपाडा आणि कासारवडवली घोडबंदर भागातील असून त्यांच्या शवविच्छेदन आणि तपासणीसाठी तसेच मृत्युच्या दाखल्यासाठी पोलीस आणि संबंधित मृताच्या नातेवाईकांना सहा ते आठ तास ताटकळत थांबावे लागले, ही खेदाची बाब आहे. कोरोनामुळे शिवाजी महाराज रुग्णालयाच्या कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यावरही ताण आहे. अशाही परिस्थितीमध्ये ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. परंतू, एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर संबंधितांच्या मागे धावपळ करणारी केवळ पत्नीशिवाय कोणी नाही. रुग्णवाहिकेचाही खर्च परवडणारा नाही. अशावेळी योग्य तो विचार करुन त्याठिकाणी शवविच्छेदन होणे आवश्यक आहे. यासाठी लोकमतच्या २३ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘मृत्युच्या दाखल्यासाठी पोलिसांची भटकंती’ या वृत्ताचाही संदभ देण्यात आला आहे. किमान यापुढे तरी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याची दक्षता घेतली जावी, संबंधितांना तसेच आदेश देण्यात यावेत. तसेच भविष्यात उपचार किंवा शवविच्छेदनासाठी हद्दीचा वाद टाळून तातडीने कार्यवाही केली जावी, अशी मागणी मनसेने केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री, ठाण्याचे पालकमंत्री, पोलीस आयुक्त आणि शिवाजी रुग्णालयाचे अधीष्ठाता यांनाही हे पत्र देण्यात आले आहे.
‘‘ मृत्युनंतर शवविच्छेन किंवा तपासणीसाठी रखड होणे अशा घटना निंदणीय आहेत. संबंधित घटनेची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही होणे अपेक्षित आहे.’’महेश कदम, अध्यक्ष, कोपरी पाचपाखाडी, विधानसभा विभाग, मनसे