ठाणे : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग क्र. ५ मधील भिवंडी ते कल्याण टप्प्यामधील, तसेच कल्याण-तळोजा मार्ग क्र. १२चे आरेखन बदलण्यासंदर्भात नव्याने सर्वेक्षण करा, असे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मंत्रालयातील त्यांच्या दालनात घेतलेल्या बैठकीत संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गापैकी ठाणे ते भिवंडी पट्ट्यातील कामाला सुरुवात झाली आहे. परंतु, भिवंडी ते कल्याण पट्ट्यातील आरेखनासंदर्भात अनेक तक्रारी करण्यात येत आहे. भिवंडी शहरातून जाणाऱ्या मार्गिकेमुळे बाधित होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. तसेच, शहरातील एक उड्डाणपुलही या मार्गिकेच्या आड येत आहे. त्यामुळे मार्गिकेचे आरेखन बदलण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. या मागणीची दखल घेऊन तात्काळ आरेखनात बदल करण्याबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश शिंदे यांनी शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.
कल्याणच्या पश्चिम भागातून जाणारी मार्गिकाही दुर्गाडी येथून थेट एपीएमसीला नेण्याऐवजी बिर्ला कॉलेज परिसर मार्गे नेल्यास कल्याण पश्चिमेचा बराचसा भाग मेट्रो मार्गाने जोडला जाईल. त्यामुळे येथील मार्गिकेतही बदल करण्याची मागणी सुरुवातीपासून होत होती. त्यामुळे याही मागणीचा विचार करून नव्याने आरेखन करण्याचे निर्देश शिंदे यांनी शुक्रवारी दिले.
कल्याण-डोंबिवली-तळोजा या मेट्रो मार्गाच्या आरेखनाबाबतही अनेक तक्रारी आहेत. फारशी लोकवस्ती नसलेल्या प्रदेशामधून हा मार्ग नेण्यात आला असून अतिवर्दळीचा भाग सोडण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. त्यामुळे या मार्गाच्या आरेखनाबाबतही सर्वेक्षण करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. या बैठकीला कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी आणि एमएमआरडीए व नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ReplyForward |