मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या मालमत्ता कर भरण्याचे ७५१ धनादेश बाऊन्स झाले असून त्यापैकी ५५१ जणांनी पैसे भरले आहेत. तर पैसे न भरणाऱ्या २०० जणांना धनादेश न वाटल्या बाबत गुन्हा का दाखल करू नये म्हणून नोटिसा पालिकेने बजावल्या आहेत.
मीरा भाईंदर महापालिकेचा मालमत्ता कर अनेक करदाते धनादेशा द्वारे भरत असतात. परंतु काहींचे धनादेश खात्यात पैसे नसणे वा अन्य कारणांनी धनादेश बाऊन्स होतात. त्यामुळे पालिकेला धनादेश न वाटण्याचा भुर्दंड बसून कागदोपत्री काम वाढते. तसेच त्या थकबाकीदार कडून कर वसुलीला विलंब होतो.
पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी कर विभागाचा आढावा घेताना धनादेश न वाटलेल्या थकबाकीदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने कर विभागाचे सहायक आयुक्त सुदाम गोडसे व त्यांच्या कार्यालयाने धनादेश बाऊन्स झालेल्यांची माहिती तयार करण्यास घेतली होती. एकूण ७५१ धनादेश बाऊन्स झाले होते व त्याची थकीत रक्कम सुमारे १ कोटी ३९ लाख रुपये इतकी होती. त्यातील ५५१ जणां कडून कर विभागाने मालमत्ता कर ची रक्कम वसूल केली आहे. तर उर्वरित २०० जणांना नोटिसा बजावून कर दंडासह न भरल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.