अंबरनाथ: अंबरनाथ नगर पालिकेचे आरोग्य विभागात काम करणारे स्वच्छता निरीक्षकाला ठेकेदाराकडून एक लाखाची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. शौचालय धुण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला बिल अदा करण्यासाठी या अधिकाऱ्याने तीन लाख ८० हजार रुपयाची मागणी केली होती. त्यातील एक लाख रुपये घेताना अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडले आहे.
अंबरनाथ नगरपालिकेतील सर्व शौचालयांची स्वच्छता करणाऱ्या ठेकेदाराला त्याचे गेल्या 11 महिन्यांपासून रखडलेले बिल अदा करण्यासाठी पालिकेतील स्वच्छता निरीक्षक विलास भोपी यांनी लाचेची मागणी केली होती. या बिलातील तब्बल तीन लाख 80 हजार रुपये मिळावे यासाठी या अधिकाऱ्यांने ठेकेदाराला वेठीस धरले होते. त्यातील 60 हजार रुपये या आधीच अधिकाऱ्याला देण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा एक लाख 80 हजार रुपये देण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्याने ठेकेदाराकडे केली होती.
मात्र एवढी मोठी रक्कम नसल्याने ठेकेदाराने एक लाख रुपये या अधिकाऱ्याला देण्याचे कबूल केले आणि या प्रकरणाची तक्रार लाच लुचपत विभागाकडे केली. लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष विलास भोपे यांनी लाच स्वीकारली. याआधी देखील महिनाभरापूर्वी पालिकेच्या घरपट्टी विभागातील एका अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली होती. महिन्यात दुसऱ्यांदा ही घटना घडल्याने पालिकेत चा कारभार हा लाच घेऊनच केला जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे