ठाणे - संपूर्ण शहर साफ करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, अशा सफाई कामगारांचा सोमवारचा दिवस मात्र वेगळा ठरला. एरवी केवळ आदेश देणा-या पालिकेच्या अधिका-यांनी चक्क शौचालय साफ करण्याची जबाबदारी उचल्याने सफाई कर्मचा-यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. स्वच्छतेबरोबरच सफाई कर्मचा-यांना दैनंदिन कामामध्ये येणा-या अडचणी समूजन घेणे हा या सफाई मोहिमेचा हेतू होता. आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेमध्ये अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, उपायुक्त्त मनीष जोशी तसेच सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड यांनी खारटन रोड येथील स्वत: 16 टॉयलेट शीट साफ केले. स्वच्छ अभियानाचा एक भाग म्हणून शहरातील महत्त्वाची ठिकाणे साफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यापुढे जाऊन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ही अनोखी संकल्पना मांडली, अशी ठिकाणं साफ झालीच पाहिजे. मात्र शहरातील वस्ती शौचालये आणि सार्वजनिक शौचालये साफ झाली तर ख-या अर्थाने सफाईचा उद्देश साध्य होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. मुंब्य्रामध्ये बाबाजी पाटीलवाडी या ठिकाणी दोन आठवड्यांपूर्वी अशी संकल्पना राबवण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत असलेल्या खारटन रोड परिसरात सकाळी मोहीम राबवण्यात आली. खारटन रोड परिसर हा संपूर्ण सफाई कामगारांचा रहिवासी परिसर असल्याने या ठिकाणची निवड करण्यात आली. या सफाई मोहिमेदरम्यान सफाई कर्मचा-यांना कोणत्या अडचणी येतात त्या समजून घेण्यात आल्या. विशेष करून पुरेशा प्रमाणात या कर्मचा-यांना पाणी उपलब्ध होत नसल्याने काम करण्यात अडचणी येत आहे. तसेच सफाईसाठी वापरण्यात येत असलेले केमिकल देखील काही प्रमाणात घटक असल्याचे अधिका-यांच्या यावेळी लक्षात आले. या सर्व अडचणी सोडवण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन या अधिका-यांनी दिले आहे . पालिका अधिका-यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे सफाई कर्मचा-यांमध्ये देखील समाधान आहे. यापुढेही अशा प्रकारची स्वच्छता मोहीम सुरू ठेवण्याचा अधिका:यांचा मानस आहे. स्वत: पालिकेचे वरिष्ठ अधिकारी अशाप्रकारे शौचालय साफ करण्याची पहिलीच वेळ असल्याने या अधिका:यांनी इतर अधिका:यांना एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी स्वच्छता अभियानांतर्गत वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव स्वच्छ करण्यात आला. सकाळी 8.30 वाजल्यापासून सुरू झालेल्या या अभियानात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेनेचे विविध नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी श्रमदान करून संपूर्ण रायलादेवी तलाव आणि परिसर स्वच्छ केला. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सेवकांनीही या अभियानात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ठाणे महापालिका स्वच्छता अभियानांतर्गत प्रभाग 12 मधील कचराळी तलाव परिसर व भोला भैया चाळ चंदनवाडी येथील परिसर खासदार राजन विचारे, नगरसेविका नंदिनी विचारे, रुचिता मोरे आदींनी स्वच्छ केला.
पालिकेच्या अधिका-यांनी चक्क शौचालय केले साफ, सफाई कर्मचा-यांना आश्चर्याचा सुखद धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 6:06 PM