ठाणे : सततच्या पावसामुळे महापालिका हद्दीत खड्ड्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागात वाहतुक कोंडी होत असल्याचे दिसत आहे. मात्र आता पावसाने उसंत घेताच, ठाणो महापालिकेच्या माध्यमातून नऊ प्रभाग समिती अतंर्गत खड्डे बुजाव मोहीम जोमाने सुरु झाली आहे. महापालिका आयुक्तांनी देखील अधिकाऱ्यांना पावसाची उघडीप जशी मिळेल तसे तत्काळ खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत.
गणोशोत्सावाच्या काळातच पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरवात केली आणि पुन्हा शहराच्या विविध भागात खड्डे पडण्यास सुरवात झाली. मागील आठवडय़ात शहरात ४०० हून अधिकचे खड्डे पडल्याचे दिसून आले. शहरात खडय़ांची संख्या ही २ हजाराहून अधिक झाल्याचे दिसून आले. पाऊस आणि खड्डे यामुळे वाहनांचा वेगही मंदावल्याचे दिसून आले. शहराच्या विविध भागात मागील काही दिवसापासून वाहतुक कोंडी होत आहे. मात्र आता पावसाने उघडीप घेतल्याने पालिकेच्या माध्यमातून पुन्हा खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पालिकेच्या नऊ प्रभाग समिती अतंर्गत ज्या ज्या भागात, ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. ते बुजविण्याची मोहीम युध्द पातळीवर हाती घेण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांना देखील संबधीत विभागाला खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत. तर नगरअभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी देखील खड्डे बुजविण्याची मोहीम कुठे आहे, कशा पध्दतीने बुजविले जात आहेत, याची प्रत्येक अपडेट द्यावी त्याचे फोटो ग्रुपवर पाठवावेत असे आदेश दिले आहेत.
सोमवारी सकाळ पासून पालिकेच्या त्या ग्रुपवर खड्डे बुजविण्याचे फोटो पडू लागले आहेत. त्यामुळे आता येत्या काही दिवसात ठाणोकरांची खडय़ांच्या कोंडीतून सुटका होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी सिमेंट, कोल्ड मिक्स, हॉट मिक्स, डांबरी पध्दतीने खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. आता देखील ही तात्पुरत्या स्वरुपातील खड्डे बुजविले जात आहेत. परंतु दिवाळी पूर्वी रस्ते चांगल्या स्थितीत होतील असा दावाही पालिकेने केला आहे.