मीरारोड - मीरा-भाईंदर महानगरपालिकेची मालमत्ता कराची संगणक आज्ञावली नव्याने विकसित करण्यात आली आहे. त्यासाठी १६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत पालिकेची कर वसुली केंद्र व ऑनलाइन कर भरणा सुविधा बंद ठेवण्यात आली आहे.
मालमत्ता कर भरणा करण्यासाठी मुख्य कार्यालय, प्रभाग समिती कार्यालये, राई-मुर्धे, उत्तन, डोंगरी, चेना, काशी व घोडबंदर येथील विभागीय कार्यालये नागरिकांच्या सुविधेसाठी आहेत. या वसुली केंद्रांद्वारे मालमत्ता कराची वसुली करण्यात येत आहे. याशिवाय नागरिकांसाठी महानगरपालिकेचे संकेतस्थळावरून तसेच मोबाइल ॲपवरूनसुद्धा ऑनलाइनद्वारे मालमत्ता कर भरण्याची सेवा उपलब्ध आहे.
मालमत्ता कराची संगणक आज्ञावली नव्याने विकसित करण्यात आली असून, त्याच्या सिस्टीम अपग्रेडेशन व डेटा मायग्रेशनसाठी गुरुवारच्या मध्यरात्रीपासून १६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत महानगरपालिकेचे सर्व मालमत्ता कर वसुली केंद्र व मालमत्ता कर ऑनलाइन भरण्याची सुविधा बंद राहील, असे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे.