ठाणे : रस्ते, फुटपाथ अडवून व्यवसाय करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या महासभेत दिले. त्यानंतर पालिकेने आता शहरातील फुटपाथ आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. परंतु, कारवाई करूनही पुन्हा फेरीवाले बस्तान मांडत असल्याने पालिकेने या फेरीवाल्यांच्या हातगाड्या तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. अशा प्रकारची कारवाई बुधवारी वर्तकनगर प्रभाग समितीत सुरू असतानाच काही फेरीवाल्यांनी येथे हंगामा केल्याचा प्रकार घडला. तसेच कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. अखेर, फेरीवाले माघार घेत नसल्याचे पाहून पालिकेने येथे पोलिसांना पाचारण केले. त्यानी फेरीवाल्यांना येथून बाहेर काढले आणि हातगाडीतोड कारवाई पूर्ण केली.महासभेत वारंवार या फेरीवाल्यांसंदर्भात प्रशासनावर आगपाखड केली आहे. परंतु, कारवाई केली तरीदेखील पुन्हा फेरीवाले दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी बस्तान मांडत असल्याचे प्रकार घडत होते. अखेर, पालिकेने फेरीवाल्यांच्या हातगाड्या तोडण्यास सुरुवात केली. वर्तकनगर भागातही मागील दोन दिवसांपासून फुटपाथ आणि रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांच्या हातगाड्या जप्त केल्या होत्या. दरम्यान, बुधवारी या हातगाड्या तोडण्याची कारवाई पालिकेने सुरू केली असता फेरीवाल्यांनी गराडा घालून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. अखेर, या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात येऊन पालिकेने या हातगाड्या तोडल्या. तसेच यापुढेही फेरीवाल्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पालिकेने दिली. (प्रतिनिधी)
पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांना अनधिकृत फेरीवाल्यांची दमदाटी
By admin | Published: July 30, 2015 1:57 AM