उल्हासनगर : महापालिका शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शाळा सेमी इंग्रजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर मीना आयलानी यांनी दिली. मनसे विद्यार्थी संघटनेने शाळा सेमी इंग्रजी करण्याची मागणी पालिकेकडे यापूर्वीच केली होती.उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळांतर्गत विविध माध्यमांच्या २८ शाळा आहेत. त्यापैकी सिंधी व मराठी माध्यमांच्या शाळांना घरघर लागली असून मागील पाच वर्षांत शाळेतील मुलांची संख्या अर्ध्यावर आली आहे. महापालिकेच्या बहुतांश सिंधी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या असून दोन सिंधी माध्यमाच्या शाळांत फक्त १९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तीच परिस्थिती मराठी माध्यमाच्या शाळेवर आली आहे. शाळेतील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी व इतर शाळांच्या तुलनेत विद्यार्थी स्पर्धेत टिकण्यासाठी महापालिकेने सेमी इंग्रजी माध्यमाचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. शिवसेना, मनसे व रिपाइंने झोपडपट्टी परिसरात पालिका शाळा नव्याने उघडण्याची मागणी केली आहे.महापौर आयलानी यांनी महापालिका शाळांपैकी हिंदी माध्यमाच्या ३, मराठी व सिंधी माध्यमाच्या प्रत्येकी २ अशा एकूण सात शाळा सेमी इंग्रजी करण्याचा निर्णय पहिल्या टप्प्यात घेतल्याची माहिती दिली. इतर शाळाही टप्प्याटप्प्याने सेमी इंग्रजी माध्यमाच्या केल्या जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे इतर मुले पालिका शाळेकडे वळतील, असा विश्वास आयलानी यांनी व्यक्त केला. तसेच गरीब व गरजू मुलांना मोफत शिक्षण घेता यावे, यासाठी इयत्ता आठवीचा वर्गही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. महापालिका शाळांत एकूण सहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून सेमी इंग्रजी माध्यमाच्या निर्णयाने मुलांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता मनसे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज शेलार व शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
पालिका शाळेत सेमी इंग्रजी , मनसेच्या मागणीला यश, गुणवत्तेवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 6:07 AM