भिवंडी : आर्थिक गर्तेत सापडलेली भिवंडी महापालिका प्रशासनाने शहरातील जमा होणारा कचरा गोळा करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करून ठेकेदार नेमण्यात आला आहे. या ठेकेदारास पालिकेच्या मालकीची कोट्यवधींची वाहने नाममात्र वार्षिक एक रुपया भाडेपट्ट्यावर देण्यात येणार आहेत.
भिवंडी पालिकेत घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात आर. अँड. बी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपनीस प्रति टन १२२९ रुपयांप्रमाणे दराला मंजुरी देत काम सहा वर्षांसाठी सोपवले आहे. त्यापोटी वार्षिक २२ कोटी ७५ लाख ७४ हजार ५२७ रुपये वार्षिक कामासाठी दिले जाणार आहेत. पालिकेने २०२० मध्ये तीन कोटी २५ लाखांच्या ५० घंटागाड्या व ६ कोटी २५ लाख ६१ हजार रुपये किमतीचे २३ रेफ्युज कलेक्टर अशा सुमारे १० कोटींची वाहने दोन वर्षे धूळखात होती, ती अवघ्या एक रुपये नाममात्र भाड्याने ठेकेदारास पालिकेने दिली आहेत.
पालिका ठेकेदारांकडून यंत्रसामग्री, सेवा, वाहन भाडेतत्त्वावर घेतात. मात्र, ठेकेदाराला पालिका आपली वाहन भाडेतत्त्वावर देते हा अजब कारभार भिवंडी पालिकेतच होऊ शकतो, अशी टीका स्थायी समिती सदस्य अरुण राऊत यांनी केली. ठेकेदाराच्या आडून शहरातील लोकप्रतिनिधी हेच हा ठेका सांभाळणार आहेत. डम्पिंग ग्राऊंडवर असलेला वजनकाटा कित्येक वर्षे नादुरुस्त आहे, त्यामुळे या ठेकेदारांच्या कचऱ्याचे वजन करणार कोठे, असा सवाल केला जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून त्यात लोकप्रतिनिधी व अधिकारी सहभागी असल्याचा आरोप अरुण राऊत यांनी केला आहे.
पालिकेचे नुकसान हाेणार नाही
ठेका सहा वर्षांसाठी देत असताना आरटीओ विभागाकडील मानक दरपत्र विचारात घेत सूत्र वापरून वाहन नाममात्र भाड्याने देताना पालिकेचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.