ठाणे - स्थायी समितीचे भिजत पडलेले घोंगड मार्गी लागल्यानंतर आता स्विकृत नगरसेवकांची सुध्दा येत्या महासभेत निवड केली जाणार आहे. यासाठी मागील वेळेस ज्या ८ सदस्यांनी अर्ज केले आहेत, त्यात अर्जांची छाननी करुन पाच सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे मागच्या दरवाजाने कोण कोण सभागृहात प्रवेश करणार हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ठाणे महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळून सुध्दा सत्ताधारी शिवसेनेला स्थायी समिती गठीत करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लोटला होता. स्थायी समितीची गणिते फिस्कटल्याने आणि पक्षीय बलाबलाचा मुद्दा उपस्थित झाल्याने इतर समित्या देखील रखडल्या होत्या. परंतु मागील काही महिन्यात या सर्व समित्या मार्गी लागल्या आहेत. त्यानंतर आता स्वीकृत नगरसेवकपदाचा मार्ग देखील आता मार्गी लागणार आहे. येत्या महासभेत त्या सदस्यांची निवड केली आहे. परंतु मागील वेळेस ज्या आठ सदस्यांनी अर्ज केले होते, त्यातील पाच सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यानुसार मागील वेळेस या पदासाठी शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे निष्ठावंतांना संधी देत दशरथ पलांडे, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते आणि जयेश वैती यांनी अर्ज दाखल केले आहेत. आघाडीमध्ये मात्र एका जागेसाठी तिघांनी आपला अर्ज दाखल केला असून यामध्ये माजी महापौर मनोहर साळवी, त्यांचे पुत्र मिलिंद साळवी आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी यांनी अर्ज दाखल केले आहेत. शिंदे यांनी आपला अर्ज दाखल करून आघाडीमध्ये स्वीकृत नगरसेवक पद मिळवण्यासाठी पुन्हा एकदा आघाडीमध्ये संघर्ष निर्माण केला होता. तर भाजपचे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे विरोध नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेत शिवसेनेचे ६७, राष्ट्रवादीचे ३४, भाजपाचे २३, कॉंग्रेसचे ०३, एमआयएम ०२, अपक्ष ०२ असे पक्षीय बलाबल आहे. त्यानुसार आता मागच्या दाराने प्रवेश करण्यासाठी शिवसेनेकडून तिघे, आघाडीकडून एक तर भाजपाकडून एक जण पालिकेच्या सभागृहात प्रवेश करणार आहे. परंतु आघाडीतून तीनपैकी एकालाच संधी मिळणार असल्याने तो कोण असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मागच्या दारातून कोण जाणार महापालिकेत, स्विकृत नगरसेवकांची होणार महासभेत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 4:46 PM
मागील दिड वर्षे रखडलेली स्विकृत सदस्यांची निवड आता मार्गी लागणार आहे. येत्या महासभेत पाच सदस्यांची निवड केली जाणार आहे. परंतु यासाठी आठ सदस्यांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये आघाडीचा केवळ एक सदस्य जात असतांनासुध्दा तीघांनी यासाठी अर्ज केलेला आहे. त्यामुळे यामध्ये कोणाचा नंबर लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ठळक मुद्देयेत्या २० जुलैच्या महासभेत होणार निवडआघाडीतील कोणाचा लागणार नंबर