ठाणे : वाहनांची वाढती संख्या, औद्योगिक कामकाज तसेच सध्या शहराच्या विविध भागात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे आणि पालिकेकचे रस्ते, मलनि:सारण वाहिन्या टाकण्याच्या कामांमुळे ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता खालावली असल्याची गंभीर बाब ठाणे महापालिकेच्या पर्यावरण अहवालात समोर आली आहे.
शहरातील एकूण हवा प्रदूषण हे ५१ ते ७५ टक्के दरम्यान असल्याचेही पर्यावरण अहवालात समोर आले आहे. शांतता क्षेत्रातही गणपती आणि देवी विसर्जन आणि दिवाळीच्या काळात ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. दिवाळीत ध्वनी प्रदूषणासह, हवेतील प्रदूषणात घट झाल्याचे दिसून आले आहे. तर, धुलीकणांच्या प्रमाणात मात्र वाढ झाली आहे. त्यातही तिनहातनाका परिसराचे सर्व्हेक्षण केले असता, येथील हवेची गुणवत्ता ही मागील वर्षी अतिप्रदूषित होती. परंतु, यंदाही त्यात सुधारणा झालेली नाही.
ठाणे महापालिका हद्दीत मागील वर्षीच्या तुलेत यंदा वाहनांच्या संख्येत ९२ हजार ९४३ एवढी वाढ झाली आहे. त्यानुसार शहरात सध्याच्या घडीला तब्बल २१ लाख ३८ हजार ६७ वाहने रस्त्यावर धावत आहेत. त्यातही शहरातील दुचाकींची संख्या ही वाढतांना दिसत आहे. तसेच आजही काही ठिकाणच्या औद्योगिक पट्ट्यात कामकाज सुरू असल्याने आणि नव्याने सुरू असलेल्या बांधकामांचा परिणाम, तसेच कळवा खाडीवरील तिसऱ्या नव्या पुलाचे काम, विविध चौकात सुरू असलेले पुलांचे बांधकाम, मेट्रोचे काम, मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचे काम यामुळे हवेतील धुलीकणांमध्ये वाढ झाल्याचे आढळले आहे. यामुळेच हवेतील प्रदूषणातही वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. शहरात आजघडीला तिनहातनाक्यापासून ते घोडबंदरपर्यंत तर तिकडे कापूरबावडी पासून पुढे भिवंडीपर्यंत मेट्रोचे काम सुरू असल्याने यामुळे हवेतील प्रदूषणाबरोबरच ध्वनी प्रदूषणातही वाढ झाली.ठाण्यातील १६ चौकांचा परिसर अतिप्रदूषित
महापालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणात शहरातील १६ चौकांचे सर्व्हेक्षण केले असता त्याठिकाणी सल्फरडाय आॅक्साइड (एसओटू), नायट्रोजन आॅक्साइडचे प्रमाण मर्यादेशपेक्षा कमी आढळले आहे. परंतु, हवेतील धुलीकणांचे प्रमाण हे मानकांच्या मर्यादेपक्षा जास्त आढळून आले आहे. यामध्ये मुलुंड चेकनाका, बाळकुमनाका, किसननगरनाका, शास्त्रीनगरनाका, कॅसलमिल, गावदेवीनाका, विटावानाक्यावरील सर्वाधिक म्हणजे मानकांपेक्षा हवेतील धुलीकणात दुप्पट वाढ झाल्याचे आढळले आहे. तर उपवन, कोर्टनाका, मुंब्रा फायर स्टेशन, माजिवडा, कापूरबावडीनाका, कोपरी प्रभाग समिती आदी ठिकाणीदेखील या धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. तर पोखरण रोड नं.१, वाघबीळ, विटावानाका, कोर्टनाका, विश्रामगृह आदी ठिकाणी केलेल्या उपाययोजनांमुळे हवेतील प्रदूषणाच्या गुणवत्तेत सुधारणा होतांना दिसत आहे.
तीनहात नाक्यावरील वायू प्रदूषण वाढले
तिनहातनाका येथे करण्यात आलेल्या वर्षभराच्या सर्व्हेक्षणात हवेतील धुलीकणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी याठिकाणीची हवेतील प्रदूषणाचा निर्देशांक ८९ टक्के होता. यंदा तो १२३ टक्के एवढा झाला आहे, याचाच अर्थ येथील हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे येथील हवा प्रदूषणात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा दिसत आहे. परंतु, धुलकणांचे प्रमाण हे काही प्रमाणात जास्त आढळून आले आहे. तर शहरातील कोपरी प्रभाग कार्यालय, शाहु मार्केट, रेप्टाकोस आदी ठिकाणी केलेल्या हवा प्रदूषणांच्या सर्व्हेत गतवर्षीच्या तुलनेत कोपरी आणि रेप्टाकोस येथील हवा प्रदूषणाचा स्तर कमी झाला आहे. तर शाहु मार्केट येथे मात्र हवेतील धुलीकणात वाढ आढळली आहे.
पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता
महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत पिण्याच्या पाण्याचीही गुणवत्ता तपासण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने वितरण प्रणालीच्या पाण्याचे १० हजार ६९६ नमुने तपासले असता त्यातील ९६ टक्के नमुने पिण्यायोग्य असल्याचे आढळले आहे. तर ४ टक्के नमुने पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर साठवणुकीच्या ठिकाणातील टाक्यांचे पाण्याचे १७ हजार ५०९ नमुने तपासले असता त्यातील ८१ टक्के पाण्याचे नमुने पिण्यायोग्य असल्याचे आढळले तर १९ टक्के पाण्याचे नमुने पिण्यायोग्य नसल्याचे आढळले आहे.
खाडी प्रदूषणातही झाली वाढ
ठाणे महापालिकेमार्फत खाडीच्या पाण्याची पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर गुणवत्ता तपासली जाते. त्यानुसार गायमुख, कोलशेत, कशेळी, साकेत, कळवा, रेतीबंदर, मुंब्रा, विटावा, कोपरी येथील खाडीच्या पाण्याची चाचपणी केली. यामध्ये खाडीचे प्रदूषणातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. खाडीत सोडण्यात येणाºया प्रदूषित पाण्यामुळे, घनकचरा टाकणे, निर्माल्य टाकणे, नाल्यातून आलेला कचरा खाडीत जाणे, औद्योगिक क्षेत्राचे पाणी थेट खाडीत जाणे यामुळे प्रुदषण वाढले आहे. महापालिकेमार्फत शहरातील ३४ तलावांच्या पाण्याचीही गुणवत्ता तपासणी केली जात आहे. यामध्ये दिवा तलाव, गोकुळनगर, कौसा, खिडकाळी, सिद्धेश्वर, हरिओमनगर, दावला या तलावांच्या पाण्याची गुणवत्ता ढासळली असल्याचे दिसून आले आहे. तर उर्वरीत तलावांच्या पाण्याची गुणवत्ता योग्य असल्याचे दिसून आले आहे.