उल्हासनगर : मुंबई येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महापालिकेने विनापरवाना होर्डिंगला नोटिसा देऊन ते निष्कसित करण्याची कारवाई अतिक्रमण विभागाने सुरू केली. विनापरवाना मोठे होर्डिंग उभारणार्याला पाठीशी घालण्या ऐवजी महापालिकेने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील सर्व जाहिरात फलकांचे सर्वेक्षण व स्ट्रॅक्टरल ऑडिट करण्याचे आदेश आयुक्त अजीज शेख यांनी मुंबई येथील जाहिरात फलकाच्या दुर्घटनेनंतर अधिकाऱ्यांना दिली होती. शहरात एकून ६७ जाहिराती फलकाला महापालिकेने परवानगी दिली असतांना कोणाच्या आशीर्वादाने मौक्याच्या जागी असंख्य अवैध होर्डिंग लावून लाखोंचा मलिदा खाल्ला. याची चर्चा शहरात रंगली आहे. सर्वेक्षणानंतर अवैध आढळलेल्या ४७ नामफलकाला महापालिकेने नोटिसा देऊन, त्या होल्डिंगवर निष्कसित करण्याची कारवाई अतिक्रमण विभागाने सुरू केली. अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. शहरात अवैध होर्डिंग लावली जात असतांना, त्याच वेळी महापालिकेने कारवाई का केली नाही?. मुंबईच्या दुर्घटनेची वाट बघत होते का? असा प्रश्न उभा ठाकला आहे.
महापालिकेने शहाड उड्डाणपूल फाटक परिसरातील दोन होर्डिंग व धोबीघाट येथील एक अवैध होर्डिंग सोमवारी निष्कसित केली. अन्य होर्डिंगवरही कारवाई करण्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले. मात्र अवैध विनापरवाना होर्डिंग लावून लाखोंचा मलिदा खाणाऱ्या होर्डिंगधारकाला पाठीशी न घालता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. महापालिकेने ज्या कंपनीला होर्डिंग लावण्याची परवानगी दिली. त्यांनीही परवानगी व्यतिरिक्त जादा विनापरवाना होर्डिंग लावल्याची चर्चा आहे. तसे असेलतर त्या जाहिरात कंपन्यांना महापालिका आयुक्तांनी काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी होत आहे. याबाबत महापालिका आयुक्त अजीज शेख काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे