उल्हासनगर : उल्हासनगर, ठाणे, मुंबई आणि अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका ही आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल आहे. त्याची नांदी आहे. त्यामुळे नागरिकांनी विचारपूर्वक मतदान करून भाजपासह इतर जातीयवादी पक्षांना मतदान करू नये, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले.उल्हासनगरच्या कॅम्प-४ येथील सुभाष टेकडी परिसरात सिद्धार्थ स्नेह मंडळाच्या मैदानात शनिवारी दुपारी भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा झाली. त्यात आंबेडकर यांनी मतदारांना हे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय चुकीचा ठरला असून त्याचे परिणाम आजही लोकांना भोगावे लागत आहेत. या निर्णयामुळे शेतकरी, व्यापारी, कारखानदार आणि सर्वसामान्य देशोधडीला लागले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणतेच मुद्दे नसल्यामुळे ते लहान मुलांसारखे भांडत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. अगरबत्ती व मेणबत्ती लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजत नाहीत, तर त्यांचे अर्थव्यवस्थेबाबतचे विचार वाचून ते ज्ञान घेतले असते; तर आजच्या परिस्थितीत अर्थव्यवस्था कशी असावी, त्याचे ज्ञान या लोकांना मिळाले असते, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला. लोकांनी भांडवलदारांच्या पक्षांना निवडून दिल्यास ते निवडून आल्यानंतर तुमच्याकडे ढुंकूनही बघणार नाहीत. भारिप बहुजन महासंघ जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असून आमच्या १३ उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. या वेळी भारिप बहुजन महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद मोहन, निरीक्षक दादा डांगळे, सारंग थोरात, शहराध्यक्ष शेषराव वाघमारे, युवक अध्यक्ष रितेश गणवीर, महिला अध्यक्ष संगीता नेरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पालिका निवडणुकीत लोकसभेची नांदी
By admin | Published: February 20, 2017 5:49 AM