लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने भिवंडी शहराला यंत्रमाग नगरी म्हणून देशभर नावलौकिक मिळाले आहे. यंत्रमाग उद्योगामुळे भिवंडीत कामगार मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आले. सुरुवातीला भाड्याने काही कामगारांनी राहण्यासाठी घरे घेतली तर काहींनी शहरात असलेल्या वन जमिनींसह, देवस्थान त्याचबरोबर मनपाच्या आरक्षित भूखंडांवर झोपड्या बांधल्या. जसजसा शहराचा विस्तार वाढला तसतसा स्थानिक लोकप्रतिनिधी व भूमाफियांनी शहरातील मोकळ्या जागा बळकावल्या व या मोकळ्या जागांवर झोपड्या, चाळी बांधून कामगारांना ही घरे भाडेतत्त्वावर राहायला दिली. मात्र आता या झोपड्यांमुळे शहराची लोकसंख्या वाढली असून महापालिका प्रशासनावर त्याचा ताण पडत आहे. परिणामी शहरातील नागरिकांना अद्ययावत सुविधा पुराविण्याबरोबरच मूलभूत सुविधा पुरविण्यातही शासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.
भिवंडीत शांतीनगर, गायत्रीनगर, नागाव या भागात टेकडीवर वसलेली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. त्याचबरोबर कामतघर, फुलेनगर, नवी वस्ती या भागातही मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वसली आहे. त्याचबरोबर वंजारपट्टी परिसरातील आमिना नगर, म्हाडा कॉलनी, चव्हाण कॉलनी, संगमपाडा, कोंबडपाडा, ईदगा रोड, अंजूरफाटा, अजमेरनगर, साठेनगर अशा शहराला चहूबाजूंनी वेढलेल्या झोपडपट्ट्या आहेत.
राज्यातील अनेक शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविली जाते. मात्र भिवंडी महापालिकेकडून अजूनही कोणतीही झोपडपट्टी विकास योजना राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत भिवंडी मनपा अनभिज्ञच राहिली आहे. झोपडपट्ट्यांचा विकास होत नसल्याने शहरातील सुविधांचा भार मनपा प्रशासनावर नेहमीच येतो. मात्र महापालिका याकडे आतापर्यंत दुर्लक्ष देत आली आहे. ज्याचा त्रास येथील स्थानिक भिवंडीकरांना होत आहे. त्यामुळे शहरविकासासाठी आता तरी भिवंडी महापालिका झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविणार का हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात अजून कुठलीही झोपडपट्टी विकास योजना सुरू केलेली नाही, अशी माहिती शहर अभियंता एल. पी. गायकवाड यांनी दिली आहे.