ठाणे: मुंबईतील अनधिकृत धोकादायक होर्डीगमुळे जिवितहानी झाल्यामुळे ठाणे महापालिका आणि पोलिसांनी सावध पवित्राघेतला आहे. ठाण्याच्या फ्लॉवर व्हॅली भागातील धोकादायक जाहिरात होर्डीग काढून टाकण्याबाबत संबंधित जागा मालक आणि ठेकेदाराला पालिका प्रशासनाने मंगळवारी नोटीस बजावली आहे. राबोडी पोलिसांच्या निर्देशानुसार याठिकाणी संबंधितांवर कारवाईचा इशाराही या नोटीसीद्वारे पालिकेने दिला आहे.
मुंबई ठाणे पूर्व द्रूतगती मार्गावर असलेल्या रुणवाल नगरातील फ्लॉवर व्हॅलीजवळ साधना विला सोसायटीच्या बाजूला एक जाहिरात होर्डींग धोकादायक स्तिीमध्ये असल्याची माहिती राबोडी पोलिस ठाण्याचे हवालदार अजित कोकिटकर यांच्याकडून ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मंगळवारी दुपारी १२.२५ वाजताच्या सुमारास मिळाली. त्याचवेळी सुरु असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या जाहिरात विभागाचे उपायुक्त दिनेश तायडे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांच्यासह उथळसर प्रभाग समिती आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने, याठिकाणी कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, धोकादायक स्थितीतील या होर्डींगमुळे या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी जाहिरात विभागामार्फत जागामालक आणि ठेकेदाराला हे होर्डींग तातडीने काढण्याच्या आदेशाची नोटीस बजावली आहे. संबंधित विभागाने याठिकाणी कार्यवाही करण्याच्या सूचनाही उपायुक्त तायडे यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.