- धीरज परब मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर मधील अरुंद रस्ते व नाक्यांवर बसलेल्या फेरीवाल्यांना सदर परिसर हा ना फेरीवाला क्षेत्र असल्याने तेथे धंदे लावू नये असे पत्र पालिकेने जारी केले . मात्र त्या नंतर देखील फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने पालिकेच्या कारवाई वरून तणाव होत आहे . तर प्रतिबंधित क्षेत्रातील फेरीवाल्यांवर कारवाई न करता महापालिका केवळ शांती नगर मध्येच कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी फेरीवाल्यांच्या संघटनेने पालिकेवर केला आहे .
शांती नगर ह्या जुन्या वसाहतीच्या ले आउट मधील असलेले रस्ते हे अरुंद असताना येथील प्रमुख चौक व रस्त्यांवर बसणाऱ्या फेरीवाल्यां मुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी व लोकांना चालण्यास जागाच नसते . इमारतींचे प्रवेशद्वार सुद्धा अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत . त्यातच चोऱ्या , छेडछाड , दादागिरी व गुंडगिरी चालत असल्याने फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी होत आहे .
काही दिवसं पूर्वी फेरीवाल्यांनी एका दुकानदारास मारहाण केल्याच्या घटने नंतर असंतोषाचा भडका उडाला . आमदार गीता जैन व प्रताप सरनाईक सह बहुतांश राजकीय पक्षांनी देखील फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली . महापालिकेने मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई सुरु केली . मध्यंतरी दिवाळी निमित्त फेरीवाल्यांना काही दिवस धंदा करण्यास मोकळीक देण्यात आली होती .
सदर परिसर हा पूर्वी पासूनच महापालिकेने ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केलेला असल्याने त्याठिकाणी फेरीवाल्यांना बसता येणार नाही असे पत्र पालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी फेरीवाला संघटना व फेरीवाल्यांना दिले .
मात्र त्या नंतर देखील फेरीवाले येऊन बसत असल्याने शुक्रवारी रात्री पालिकेने कारवाई करण्यास घेतली असता फेरीवाल्यांनी कारवाईला विरोध करत अरेरावी - दादागिरी चालविल्याने तणाव निर्माण झाल्याचे रहिवाश्यांनी सांगितले . शनिवारी रात्री सुद्धा फेरीवाले मोठ्या संख्येने बसले होते . तर पोलिसांचा बंदोबस्त न मिळाल्याने पालिकेला फेरीवाल्यांवर कारवाई करता आली नाही असे सांगितले जाते.
दरम्यान फेरीवाला संघटनेच्या नेत्याने मात्र , रेल्वे स्थानक , शाळा , धार्मिक स्थळे आदी परिसरात फेरीवाले बसत असताना तिकडे पालिका कारवाई करत नाही असा आरोप केला . केवळ शांती नगर मधीलच फेरीवाले पालिकेला दिसतात का ? असा सवाल करत मुंबई सह शहरातील सर्व फेरीवाल्यांना शांती नगर मध्ये बसवून आंदोलन करू असा इशारा देखील पालिका व पोलिसांना दिला आहे .