मीरा रोड : उत्तनच्या करईपाड्यातील स्थानिक भूमिपुत्रांच्या दोन कुटुंबीयांच्या जुन्या घरांमधून बळजबरीने रस्ता बनवण्याच्या महापालिकेच्या दांडगाईविरोधात ग्रामस्थांचा उद्रेक झाला. संतापलेल्या ग्रामस्थांनी पालिका पथकास हुसकावून लावले. प्रभाग अधिकाऱ्याने ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्याची धमकी देत काढता पाय घेतला. तर, ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याने रात्रभर तणावाचे वातावरण होते.
करईपाड्याच्या लुझरवाडी पुलासमोर ग्रामपंचायत काळापासून भूमिपुत्र असलेल्या कोळी समाजातील डिसोझा व कोंत्या कुटुंबीयांची जुनी घरे आहेत. या दोन्ही घरांच्या मध्ये पूर्वीपासून भिंत आहे. तर, मागील भागात कोंत्या कुटुंबीयांच्या जागेत धार्मिक क्रूस आहे. ही जागा खाजगी मालकीची असून या ठिकाणी पालिका विकास आराखड्यातही कोणताही रस्ता नाही. असे असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घरांच्या मागील भागात असलेल्या जमीनमालकांनी बांधलेल्या बेकायदा बांधकामासाठी रस्ता करून देण्याचा घाट संगनमताने घातला.
प्रभाग अधिकारी सुनील यादव हे १८ सप्टेंबर रोजी मोठा पोलीस फाटा तसेच बाउन्सर घेऊन गेले. कुठलीही नोटीस न देताच बळजबरीने जुनी कुंपणभिंत तोडून टाकली. यावेळी कोंत्या व डिसोझा कुटुंबीयांनी दोन्ही घरांमधील हद्दीची कुंपणभिंत आहे. तुमच्याकडे कसले आदेश आहेत दाखवा, असे सांगत विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस आणि बाउन्सरच्या धाकात कारवाई करण्यात आली.भिंत तोडल्याप्रकरणी कोंत्या व डिसोझा कुटुंबीयांसह शिवसेना नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी थेट आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे तक्रार केली व सर्व कागदपत्रे दिली. तर, उत्तन सागरी पोलीस ठाणे आणि भार्इंदर उपअधीक्षक कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेलेल्या या कुटुंबीयांची पोलिसांनी तक्रारही घेतली नाही. त्यानंतरही प्रभाग अधिकारी यादव यांनी उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे पत्र व नगरसेवक अमजद शेख यांनी पालिकेला या ठिकाणी रस्ता बांधण्याच्या दिलेल्या पत्राचा संदर्भ देऊन २७ सप्टेंबर रोजी कोंत्या व डिसोझा कुटुंबांना नोटीस काढून दोन दिवसांत घर आणि जमिनीची कागदपत्रे सादर करा तसेच रस्ता मोकळा करा, असे त्यात बजावले होते. परंतु, त्या नोटीसची प्रत डिसोझा व कोंत्या कुटुंबीयांना १ आॅक्टोबर रोजी दिली.
त्यानंतर, यादव हे मोठा पोलीस बंदोबस्त व बाउन्सर घेऊन तोडलेल्या भिंतीचे दगड व जुना क्रूस हटवण्यास आल्याचे कळताच संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले. यादव हे सोबत रस्ता बनवण्याचे साहित्य घेऊन आले होते. ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला असता यादव हे त्यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन निघून गेले. संतप्त ग्रामस्थांनी त्या ठिकाणाहून चाललेली भाजपची प्रचारयात्रा अडवून जाब विचारला. विशेष म्हणजे पालिकेने भिंत तोडल्याच्याविरोधात कुटुंबीयांनी ठाणे न्यायालयात याचिका केली आहे.
मला घटनेची माहिती मिळाल्यावर मी प्रभाग अधिकारी सुनील यादव यांना कार्यवाही थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणुकीनंतर पाहणी करून व संबंधितांचे म्हणणे ऐकून निर्णय घेऊ.- बालाजी खतगावकर, आयुक्तमला आयुक्तांनी तोंडी आदेश दिल्याने मी भिंत तोडली होती. तसेच नगरसेवक अमजद शेख व मागील बांधकामधारकांनी रस्ता बनवून देण्यासाठी पत्र व पाठपुरावा केला होता.- सुनील यादव, प्रभाग अधिकारीहा स्थानिकांवर पालिका आणि राजकारण्यांचा अत्याचार सुरू आहे. दोन घरांमधील जुनी कुंपणभिंत व क्रूस असूनही आमच्या मागच्या भागातील परप्रांतीयांच्या बेकायदा बांधकामांसाठी पालिकेने दादागिरी चालवली आहे. याप्रकरणी प्रभाग अधिकारी यादव यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित केले पाहिजे.- डॉ. एडिसन कोंत्या, ग्रामस्थ