ठाणे : जनजागृती करूनही मासुंदा तलावात विहार करणाऱ्या कुरव (सीगल्स) पक्ष्यांना मानवी खाद्यपदार्थ टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी संस्थांनी ठाणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली. परंतु, या मागणीकडे पालिकेने आठवडाभर दुर्लक्ष केल्याचा आरोप पर्यावरण संस्थांनी केला. ही माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पोहोचल्यावर त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार, रविवारी सकाळी पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांत संपूर्ण तलावाभोवती जागृतीपर फलक लावण्याचे, तसेच नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
मासुंदा तलावामधील कुरव पक्ष्यांना काही बेजबाबदार नागरिक मानवी खाद्यपदार्थ टाकून त्यांच्या जीवाशी खेळतात. नागरिकांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांप्रमाणेच तलावातील जीवसृष्टीवर व नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होतो. याबाबत येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या संलग्न संस्था तसेच मराठा जागृती मंच, वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन, पर्यावरण दक्षता मंडळ या पर्यावरणवादी संस्थांतर्फे जनजागरण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. बहुसंख्य नागरिकांकडून या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असला, तरी काही बेजबाबदार नागरिक उद्दामपणे वागतात. सूचनांचे पालन न करता पक्ष्यांना शेव, गाठी आदी खाद्यपदार्थ टाकून नियम मोडतात. महानगरपालिकेला याची माहिती देण्यात आली होती. सीगल पक्ष्यांना त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक खायला टाकणे बेकायदेशीर आहे. या आशयाचे या ठिकाणी माहितीपर फलक बसवावेत. सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा. स्वच्छता मार्शल्स नेमून दिवसभर कारवाई करावी, अशी मागणी येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार, रविवारी सकाळी ठामपा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य अधिकारी मनीषा प्रधान यांनी कर्मचाऱ्यांसह वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जनजागरण कार्यक्रमात हजेरी लावली, असे येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे समन्वयक रोहित जोशी यांनी सांगितले.
यावेळी प्रधान यांनी येथे उपस्थित नागरिकांना सरकारच्या माझी वसुंधरा कार्यक्रमांतर्गत मासुंदा तलावाचे संवर्धन करण्याची शपथ दिली. मासुंदा तलाव प्रदूषित करणार नाही व त्याचे संवर्धन करीन अशी शपथ उपस्थितांनी घेतली. यावेळी मराठा जागृती मंच पानिपत, ठाणे विभाग अध्यक्ष संजय जाधव, सुधाकर पतंगराव पर्यावरण दक्षता मंडळाचे हेमंत नाईक, डब्ल्यूडब्ल्यूएचे आशीष साळुंके, निखिल जाधव उपस्थित होते.
-------