ठाणे : कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नॉनकोविड हॉस्पिटलमध्येही कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असल्याची धक्कादायक बाब मंगळवारी ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवकांनी पुन्हा उघडकीस आणली. विशेष म्हणजे, अशा रुग्णांवर उपचार करताना त्यांची कोविड टेस्ट केली जात नसून केवळ रक्ताची चाचणी किंवा एक्सरे रिपोर्ट घेतले जात असल्याचा धक्कादायक आरोपही यावेळी नगरसेवकांनी केला. त्यानुसार पुढील १० ते १५ दिवसांत सर्व रुग्णालयांची पाहणी करून अशा पद्धतीने उपचार केले जात असतील तर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी दोन समित्या नेमण्याचे आश्वासन आरोग्य विभागाने महासभेसमोर दिले.
महासभा सुरू होताच, शिवसेनेच्या नगरसेविका मीनल संख्ये यांनी या मुद्याला हात घातला. विशेष म्हणजे पालिकेने यापूर्वी कारवाई करूनही खाजगी रुग्णालये असे धाडस कसे करतात, असा सवाल त्यांनी केला. या मुद्द्यावर बोलताना इतर नगरसेवकांनीदेखील अशा नॉनकोविड रुग्णालयांवर काय कारवाई करणार, असा सवाल करून पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यामुळे इतर रुग्णांनादेखील लागण होऊ शकते, त्यामुळे कोरोनाला अटकाव कसा घालणार, असा सवाल नगरसेविका अर्पणा साळवी यांनी केला.
दहा दिवसांत पाहणी करून कारवाईमहापौर नरेश म्हस्के यांनी अशा प्रकारे नॉनकोविड रुग्णालयांत उपचार होत असतील तर त्यामुळे रुग्णांची संख्या वाढू शकते. त्यामुळे अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. राजू मुरुडकर यांनी शहरातील सर्व रुग्णालयांची पाहणी करून नियमानुसार कारवाई करण्याचे, तसेच जास्तीची बिले आकारली गेली असतील तर त्याबाबतही दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.