ठाणे : इमारतीमध्ये लपून बसत सकाळी मुलांना शाळेत नेणा-या महिलांचा विनयभंग करणा-या अतिक आरीफ अन्सारी (रा. कळवा) या एकोणीस वर्षीय तरुणाला कळवा पोलिसांनी ५० वेगवेगळ्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शनिवारी अटक केली. दरम्यान, परीक्षेच्या कारणास्तव न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन दिला आहे.मनीषानगर, गेट क्रमांक-१ येथे तीसवर्षीय महिलेचा त्याने विनयभंग केल्याची तक्रार शनिवारी दाखल झाली. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपीला शोधण्याचे आदेश दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी पाच पथके तयार केली. या पथकांनी वेगवेगळ्या भागांतील ५० सीसीटीव्हींची तपासणी केली. एका अंडेविक्रेत्याने ओळखल्यानंतर त्याला १ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. दीड महिन्यापूर्वीही मनीषानगर भागात पस्तीसवर्षीय महिलेचाही त्याने अशाच प्रकारे विनयभंग केला होता. हा गुन्हाही त्या महिलेने रविवारी दाखल केला. अशा प्रकारे कोणीही छेडछाड करत असेल, तर महिलांनी न डगमगता तक्रारीसाठी पुढे यावे. या तरुणाने पहिला प्रकार केल्यानंतर त्याची तक्रार न झाल्याने तो असे प्रकार करण्यास सरावला. त्यामुळे महिलांनी वेळीच तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन बागडे यांनी केले.
विनयभंग करणाऱ्या तरुणास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 4:52 AM