जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: जमीन खरेदी विक्री प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना सकारात्मक अहवाल पाठविण्यासाठी ७० हजारांची मागणी करुन ५० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सुधीर बोंम्बे (५०) या मुरबाड तालुक्यातील म्हसा येथील मंडळ अधिकाऱ्याला नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहाथ अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील तक्रारदार यांना ठाणे जिल्हयाच्या मुरबाड तालुक्यातील मालेगाव गावातील एका गटाच्या जमिनीच्या विक्री व्यवहारासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत जमीन मालकाकडून अधिकार पत्र मिळाले आहे. ही मिळकत मालमत्ता खरेदी विक्री करणारे दोघेही आदिवासी आहेत. त्यामुळे ती मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी ठाण्याच्या जिल्हाधिकारी यांना सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी म्हसा येथील मंडळ अधिकारी सुधीर बोंम्बे यांनी तक्रारदाराकडे ८ सप्टेंबर २०२३ रोजी ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तसे नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीमध्येही उघड झाले होते. त्यानंतर ४ आॅक्टोंबर २०२३ रोजी एसीबीच्या नवी मुंबईचे उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाने या कारवाईसाठी सापळा लावला होता. या दरम्यान, बोंबे याने तक्रारदार यांच्याशी केलेल्या संभाषणा दरम्यान ६० हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ५० हजारांची लाच स्वीकारली. त्यावेळी त्यांना एसीबीच्या या पथकाने रंगेहाथ पकडल्याची माहिती ठाणे एसीबीचे अपर पाेलिस अधीक्षक अनिल घेरडीकर यांनी दिली.