मुरबाड : तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना महसूल खात्याने तालुक्याची आणेवारी जाहीर करून संकटात सापडलेल्या बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. तर कार्यालयात बसून सरकारी अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवण्याचे काम केल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस चेतनिसंह पवार यांनी केला असून मुरबाड तालुक्यासह ठाणे जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे.राज्यात सर्वाधिक पाऊस ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पालघर जिल्ह्यात होत असतो. साधारण १२० ते १३० दिवस हा पाऊस होतो. मात्र, यंदा या जिल्ह्यात पावसाचा नीचांक नोंदवला असून जेमतेम ८० दिवस पाऊस झालेला आहे. जी स्थिती या जिल्ह्यात तीच स्थिती मुरबाड तालुक्यात. भात पीकासाठी कमीतकमी १२० दिवस पावसाची आवश्यकता असताना तालुक्यात ८० दिवस पाऊस झाला आहे. अल्प पावसामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला असतानाच मुरबाडच्या महसूल विभागाने सप्टेंबर महिन्यांत ८० पैसे नजर आणेवारी जाहीर केली आहे. पाऊसच कमी पडल्याने हळवी पिके साधारण हातात लागली आहेत. तर गरवी, निमगरवी पिके करपली आहेत. भाताच्या लोंब्यांत तांदळाऐवजी पळींज जास्त असल्याने तालुक्यात भाताचे उत्पन्न ५० पैशांपेक्षा कमी आले असताना मुरबाडच्या तहसील कार्यालयाने ८० पैसे आणेवारी दाखवून गोरगरीब शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.>वस्तुस्थितीची पाहणी करातलाठी, मंडळ अधिकारी यांना गावोगावी पाठवून खºया वस्तुस्थितीची पाहणी करावी आणि तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीचे निवेदन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी खासदार सुरेश टावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन चौधरी यांना दिले.
मुरबाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, काँग्रेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:13 AM