मुरबाड : कोरोनानंतर मुरबाड तालुका हा सध्या तापाने फणफणला आहे. त्यातच ग्रामीण रुग्णालयातील लॅब गेले तीन महिने बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील २०७ गावांसह शहरी ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी मुरबाड ग्रामीण रुग्णालयावर आहे. बाह्यरुग्ण विभागात दररोज ३०० ते ४०० रुग्ण येतात. त्यातील १०० ते १५० रुग्णांना मलेरिया, टायफॉइड याची लागण झाल्याचे निष्पन्न होत असल्याने रक्ताची तपासणी करण्यासाठी डाॅक्टर सल्ला देतात. परंतु ही तपासणी मोफत वा वाजवी दरात ग्रामीण रुग्णालयात होत असली तरी तेथील लॅबमधील तपासणी करणारे मशीन गेल्या तीन महिन्यांपासून नादुरुस्त आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या लॅबमधील मशीन हे नादुरुस्त आहे. त्यामुळे येथील रक्ताचे नमुने हे शहापूरमधील लॅबमध्ये पाठविण्यात येत आहेत. मात्र ते तीन दिवसांत न देता त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत मेलवर पाठविण्यात यावेत अशा सूचना देण्यात येत आहेत. - डॉ. गौरी राठोड, उपसंचालिका, आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे