जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: सासूसह पतीशी झालेल्या काैटुंबिक वादातून नवी मुंबईतील घरातून बाहेर पडून डायघरमधील मंदिरात थांबलेल्या एका ३० वषीर्य विवाहितेवर सामुहिक बलात्कार करुन तिचा खून करणाऱ्या श्यामसुंदर प्यारचंद शर्मा (६२, कोटा, राजस्थान) याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती ठाण्याचे पाेलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी शुक्रवारी दिली. तिघांनाही १० जुलैपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
शिळगाव येथील घोळ गणपती मंदिराच्या मागे या महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत ९ जुलै २०२४ रोजी डायघर पाेलिसांना मिळाला हाेता. तिच्या शरीरावर जखमा असल्याने तिचा खून झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली हाेती. त्यानुसार शिळडायघर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम १०३(१) नुसार खूनाचा गुन्हा दाखल झाला.चाैकशीमध्ये नवी मुंबईच्या एनआरआय पोलीस ठाण्यात बेलापूर गावातून एक महिला बेपत्ता असल्याची माहिती समाेर आली. ती बेपत्ता असल्याची तिच्या वडिलांनी एनआरआय पाेलिस ठाण्यात ६ जुलै २०२४ राेजी तक्रारही दाखल केली हाेती. ओळख पटल्यानंतर याप्रकरणी डायघर पाेलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला हाेता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पाेलिस निरीक्षक महेश काळे, अब्दुल मलीक, उपनिरीक्षक संकेत शिंदे आदींची तीन पथके बनवून आरोपींचा शोध सुरू केला.
घटनास्थळी मिळालेले सीसीटीव्हीतील फुटेज पडताळल्यानंतर डायघर भागातील घोळ गणपती मंदिर आणि गौशाला परिसरातील संताेषकुमार मिश्रा (४५, रा. प्रतापगड, उत्तरप्रदेश) राजकुमार पांडे (५४, रा. उत्तरप्रदेश) या दोघांना मंदिर परिसरातूनच ताब्यात घेतले. त्यांना ‘बाेलते’ केल्यानंतर त्यांनी तिच्या खूनाची कबूली दिली. त्यांचा साथीदार श्यामसुंदर शर्मा या तिघांनी मिळून रात्रीच्या वेळी मंदिरात थांबलेल्या या महिलेला चहामध्ये भांगेच्या गाेळया टाकून गुंगीमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचीही कबूली दिली. शुद्ध आल्यावर तिने आरडाओरडा केल्यामुळे, तिने या प्रकाराची वाच्यता करु नये म्हणून मंदिरामागील दरीत नेऊन दगडाने तिची हत्या केल्याचेही या चाैकशीत त्यांनी सांगितले. तिसरा आरोपी शर्मा याला मानखुर्द भागातून अटक केली.
घोळ गणपती परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीचे केबल तोडून आराेपींनी पुरावाही नष्ट केला हाेता. मात्र, तांत्रिक तपासाच्या आधारावर त्यांना पाेलिसांनी अटक केली.
मानसिक तणावामुळे विवाहिता मंदिरात थांबली-
काैटुंबिक वादातून मानसिक तणावाखाली असल्याने ही महिला नवी मुंबईतून ६ जुलै राेजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील शीळगाव मधील घाेळगणपती परिसरात आली हाेती. दरम्यान, या मंदिराचे पुरारी हे काही कामानिमित्त ५ जुलै राेजी गावी गेले. जाण्यापूवीर् त्यांनी श्यामसुंदरसह तिघांना त्याठिकाणी मंदिराच्या सेवेसाठी ठेवले हाेते. त्यांनी मात्र, एकटया महिलेला गाठून तिला आसरा देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर शुद्ध आल्यानंतर तिने आरडाओरड करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा या तिघांनीही तिचे डोके जमिनीवर आपटून गळा दाबून तिचा खून केल्याचे उघड झाले आहे.