ठाणे - नवऱ्याच्या छळातून प्रेयसीची सुटका करण्यासाठी तिच्या नवऱ्याला संपवण्याचा रचलेला कट ठाण्यातील एका बिझनेसमॅनवरच उलटला. हा कट प्रत्यक्षात येण्याआधीच ठाणे पोलिसांनी निलेश चालावाबे(27), ब्रिजेश कुमार पांडे (24) आणि अजय मौर्य (22) यांना अटक केली. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार हे तिघे मंगळवारी रात्री वडोदराला जाणारी बस पकडण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तिघांना अटक केली. पोलिसांनी पांडेकडून देशी बनावटीची पिस्तुल तर मोर्यकडून खेळण्यातील बंदूक जप्त केली.
तिघांविरोधात शस्त्रास्त्र कायद्यातंर्गत आयपीसीच्या कलम 115 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश चालवाबे विवाहीत असून त्याला सहा महिन्यांचा मुलगा आहे. निलेशचे ठाण्यात राहणा-या एका मुलीवर प्रेम होते. पण दीडवर्षापूर्वी या मुलीचे वडोद-यातल्या मुलाबरोबर लग्न झाले. लग्नानंतरही निलेश आणि त्याची प्रेयसी संपर्कात होते. निलेशची प्रेयसी सतत त्याच्याकडे नव-याकडून होणा-या त्रासाविषयी तक्रार करत असे.
आपला नवरा क्रूर माणूस आहे. तो सतत आपला छळ करतो अशी तक्रार ती करायची. प्रेयसीला रोज होणारा त्रास निलेशला सहन होत नव्हता. नव-याच्या छळातून लवकरच तुझी मुक्तता करीन असा त्याने तिला शब्द दिला. जर तू काही केले नाहीस तर मीच स्वत: काही तरी करुन ठाण्यात येईन अशी धमकी प्रेयसीने निलेशला दिली होती. आपल्या प्रेयसीची या रोजच्या त्रासातून सुटका करण्यासाठी अखेर निलेशने तिच्या नव-याच्या हत्येचा कट रचला.
ब्रिजेश कुमार पांडेबरोबर निलेशचे व्यावसायिक संबंध होते. त्याने पांडेला विश्वासात घेतले. त्यावेळी पांडे हत्येच्या कटात सहभागी होण्यासाठी तयार झाला. पांडेने आणखी एक साथीदार सोबतीला घेतला व पिस्तुलाची व्यवस्था करण्यासाठी 4 लाख रुपयांची मागणी केली. निलेशने त्याला आधी 70 हजार रुपये दिले. त्यातून पिस्तुलाची व्यवस्था झाली. हा सर्व व्यवहार सुरु असताना पोलिसांच्या खब-याला या कटाचा सुगावा लागला. त्याने पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी ठाण्यातील ओवाळा गावाजवळ सापळा रचला. दोन जण बस स्थानकावर बसची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी बाईकवरुन एक जण तिथे आला व त्याने काही पैसे त्यांना दिले. त्यानंतर पोलीस तिथे आले व तिघांना ताब्यात घेतले. निलेशच बाईकवरुन आला होता त्याने खर्चासाठी म्हणून दोघांच्या हातावर 10 हजार रुपये ठेवले असे कासारवडावली पोलिसांनी सांगितले. तिघांनी पोलीस चौकशीत हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. त्यांनी वडोद-यातील महिलेच्या घराचीही पाहणी केली होती.
महिलेचा या कटाशी काही संबंध नाही असे निलेशने पोलिसांना सांगितले. पण पोलीस तिची सुद्धा चौकशी करणार आहेत. नव-याला संपवल्यानंतर प्रेयसी ठाण्यात येऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करेल. त्यानंतर एकत्र राहण्याची दोघांचा प्लान होता. आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.