ठाणे : पूर्ववैमनस्यातून मुंब्य्रातील रफिक ऊर्फ शब्बीर इस्तियाफ खान (३०) याची हत्या मारणाऱ्या दोघांना ठाणे न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एस.पी. गोंधळेकर यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यातील दाऊद हसन ठाकूर हा आरोपी अद्यापही फरार आहे. ही घटना २७ आॅगस्ट २०१५ रोजी घडली होती. या खटल्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वला मोहोळकर यांनी काम पाहिले.
ठाणे गुन्हे शाखा युनिटने संशयावरून अजगर अली ऊर्फ अज्जू हसन ठाकूर (३०) आणि सलीम अब्दुल मजीद शेख (३५) या दोघांना अटक केली होती. अजगर याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली. दरम्यान, अजगर याचे रफिक आणि त्याच्या मित्रासोबत जुने भांडण झालेले होते. त्याच रागातून अजगर याने आरोपी सलीम आणि फरार दाऊद यांच्याशी संगनमत करून रफीकवर गावठी कट्ट्याने गोळी झाडून जखमी केले. तो मरण पावल्याचे समजून रिक्षातून पळ काढल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला न्यायाधीश गोंधळेकर यांच्या न्यायालयात हे प्रकरण आल्यावर सरकारी वकील मोहोळकर यांनी सादर केलेले विविध पुरावे आणि ११ साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून अजगर अली आणि सलीम शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.राबोडी पोलीस २७ आॅगस्ट २०१५ रोजी रात्रीच्या वेळी साकेत परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी साकेतकडील सर्व्हिस रोडवर रफि क खान हा गोळी लागल्याने जखमी अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अनोळखी मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी मृताची ओळख पटली नव्हती. त्यासाठी पोलिसांनी गुप्त बातमीदारांमार्फत मृताची ओळख उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी काहींची चौकशीही करण्यात आली होती.