ठाणे : पतीकडून वारंवार होत असलेल्या मारहाणीला कंटाळून अनैतिक संबंध ठेवलेल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या रुक्सार शेख (३०) या पत्नीसह तिघांना अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली. सुरुवातीला धागादोरा नसताना मोठ्या कौशल्याने मुंब्रा पोलिसांनी या खुनाचा छडा लावला.
मुंब्रा खाडीवरील जुन्या पुलाजवळील एमएम व्हॅलीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह २७ फेब्रुवारीला सकाळी ८.४० च्या सुमारास आढळला होता. त्याच्या गळ्यावर चॉपरने वार करून त्याचा खून केला होता. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांत अनोळखी व्यक्तीविरुद्ध खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या खुनातील मृतदेहाची ओळख पटवून आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या खुनाच्या तपासासाठी विशेष पथकांची स्थापना करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, हा मृतदेह अहमद याचा असल्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. सहायक पोलीस आयुक्त नीता पडवी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, निरीक्षक रामचंद्र वळतकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले आणि शहाजी शेळके यांच्या पथकाने अहमद शेखची पत्नी रक्सार आणि मेव्हणी रेश्मा (२८) यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यातूनच त्यांच्यावर या पथकाचा संशय बळावला. त्यानंतर पथकाने त्यांच्या सर्व हालचालींवर बारकाईने नजर ठेवली. तेव्हा रुक्सारचा प्रियकर मोहम्मद नफील शेख (३०) याच्याकडे केलेल्या चौकशीत अहमद याची पत्नी रुक्सार आणि मेव्हणी रेश्मा (२८) यांच्याशी संगनमत करून अहमद याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर मोहम्मद शेख, रुक्सार आणि रेश्मा या तिघांना २ मार्चला मुंब्रा पोलिसांनी अटक केली.
असा घडला प्रकार
अहमद हा त्याची पत्नी रुक्सार हिला नेहमी क्षुल्लक कारणावरून मारहाण करत होता. याच मारहाणीला कंटाळून तिने प्रियकर मोहमद आणि रश्मी यांच्याशी २४ फेब्रुवारीला पतीला मारण्याचा कट केला. याच कटातून २७ फेब्रुवारीला त्याचा खून करण्यात आला. मात्र, मुंब्रा पोलिसांनी केलेल्या तपासातून हा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
--------------