ठाणे : पंढरपूरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांचा रविवारी दिवसाढवढया खून करुन पसार झालेल्या चौघा खून्यांना दोन पिस्टलसह ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने सोमवारी सायंकाळच्या सुमारास ठाण्यातून अटक केली. त्यांच्याकडून दरोडयाची सामुग्रीही हस्तगत करण्यात आली आहे.सात ते आठ जणांची सशस्त्र टोळी ठाण्यातील माजीवडा येथील पेट्रोल पंप लुटण्यासाठी येणार असल्याची ‘टीप’ गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ज्युपिटर रुग्णालयाच्या परिसरातून सायंकाळी ६ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास दरोडयाच्या तयारीतील अक्षय सुरवसे (२२), पुंडलिक वनारे (३३), मनोज शिरसीकर (३२) आणि बत्तराज धुमाळ (२६, सर्व रा. पंढरपूर) या चौघांना शर्मा आणि निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विकास घोडके, उपनिरीक्षक विकास बाबर, अविनाश महाजन, विकास कुटे, एच. ए. ढोले आदींच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडील सखोल चौकशीत त्यांनी टोळीयुद्धातून पंढरपूरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्यावरएका हॉटेलच्या बाहेर पाच गोळया झाडून खून केल्याची कबूली दिली. खूनानंतरही या टोळीने त्यांच्यावर चॉपरने हल्ला केला होता. या खूनासाठी वापरलेले दोन पिस्टलही त्यांच्याकडून हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हत्येच्या निषेधार्थ पंढरपूरमध्ये सोमवारी बंद पाळण्यात आला. जवळचे पैसे संपल्यामुळे हे टोळके ठाण्यात पुन्हा लुटमार करण्याच्या तयारीत होते, त्याचवेळी ठाणे पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. दरम्यान, यासंदर्भात अधिक माहिती सोमवारी देण्यात येईल, संबंधित आरोपींकडे चौकशी सुरु असल्याचे प्रदीप शर्मा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पंढरपूरच्या अपक्ष नगरसेवकाच्या खून्यांना दोन पिस्टलसह ठाण्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:32 PM
नगरसेवक संदीप पवार यांच्या खूनानंतर ठाण्यातील पेट्रोलपंप लुटीसाठी आलेल्या चौघांना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. टोळी युद्धातून पवार यांची हत्या केल्याची कबूली या पथकाने पोलिसांना दिली.
ठळक मुद्देखंडणी विरोधी पथकाची कारवाईपेट्रोल पंप लुटीची केली होती तयारीटोळी युद्धातून खून केल्याची कबूली