लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कचरा उचलण्याच्या आणि पैशाच्या वादातून दिवसाढवळ्या कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर एका तरुणाची हत्या केल्याप्रकरणी अशोक लोदी (रा. मूळ भोपाळ) याला रेल्वेच्या गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी उशिराने मशीद बंदर येथून अटक केली. सीसीटीव्हीच्या फूटेजद्वारे पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.
कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक १ वर ३ जुलैला सकाळी तीन तरुण आपसात भांडत होते. या वेळी एका तरुणाने दुसऱ्यावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. ज्या वेळी ही घटना घडली त्या वेळी फलाटावर अचानक लोकल आली. लोकलमधून प्रवासी उतरले. लोदीही त्या गर्दीत सामील झाला. त्यामुळे तो कोणत्या दिशेने पसार झाला, हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत स्पष्ट होत नव्हते.
कल्याण रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला. कल्याण येथील गुन्हे शाखेने तपासादरम्यान तीनपैकी एक तरुण शंकर राठोड याला ताब्यात घेतले. मात्र, त्याला मृत तरुण आणि आरोपी यांची नावे माहीत नव्हती. त्यामुळे मृताच्या नातेवाइकांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. अखेर १० दिवसांनंतर रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले. पोलिसांची पाच पथके आरोपीचा शोध घेत होती. अखेर लोदी याला मशीद बंदर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तो तीन महिन्यांपूर्वीच भोपाळहून मुंबईला आला होता.
मृत तरुण नारायण मरावी आणि अशोक लोदीमध्ये कचरा उचलण्यावरून आणि पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला होता. त्यातून लोदी याने मरावी याची हत्या केली. सोमवारी सायंकाळी गजेंद्र पाटील यांच्यासह कल्याण रेल्वे गुन्हे शाखेचे अधिकारी अरशद शेख यांच्या पथकाने लोदी याला कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
----------------