लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : लग्नास नकार देणाऱ्या मनिष यादव या प्रियकराच्या डोक्यावर हातोडा मारून त्याची हत्या करून, त्याचा मृतदेह चिखलामध्ये फेकून देणारी प्रेयसी अनिता यादव आणि तिला मदत करणारा भाऊ विजय भल्लारे यांना शिळ-डायघर पोलिसांनी गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या पत्र्याच्या पेटीच्या आधारे चोवीस तासांमध्ये शिताफीने अटक केली.
गुरुवारी संध्याकाळी दिवा-शिळ रस्त्याजवळील खाडीपुलाच्या डाव्या बाजूला असलेल्या चिखलामध्ये पत्र्याच्या पेटीमध्ये सडलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाबाबत कुठलीही ठोस माहिती नसल्यामुळे तपास करणाऱ्या पोलीस पथकातील पोलिसांनी मृतदेह ज्या पेटीमध्ये आढळून आला त्या पेट्यांची विक्री आणि उत्पादनाच्या ठिकाणांचा तपास केला. तपासाअंती गुन्ह्यात वापरलेली पेटी मुंबईतील धारावी येथील डांबर कम्पाउंड येथे बनविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे जाऊन पोलिसांनी चौकशी केली असता एका महिलेने ३० एप्रिलला पेटी खरेदी केल्याची माहिती मिळाली. ज्या महिलेने पेटी खरेदी केली तिचा मोबाइल पोलिसांनी ट्रेस केला असता तो नवी मुंबईतील घणसोली परिसरात ॲक्टिव्ह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अनिता यादव या महिलेला ताब्यात घेतले. तिने भाऊ विजय भल्लारे (रा. नथानी टॉवर, लेबर कॅम्प, मुंबई सेंट्रल) याच्या मदतीने दिव्यात राहत असलेल्या मनिष यादव याची घरामध्ये झोपेत असताना ६ मे रोजी डोक्यावर हातोड्याने प्रहार करून हत्या केली. त्याचा मृतदेह पेटीमध्ये भरून खाडीजवळील झुडपांमध्ये फेकून दिला. दीड वर्षापासून मनिषचे अनितासोबत शारीरिक संबंध होते. मनिष हा अनिताशी लग्न करण्यास नकार देत होता. यामुळे अनिता व भाऊ विजय यांनी संगनमत करून मनिषची हत्या केल्याची कबुली दोघांनी चौकशीत दिल्याची माहिती शिळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली.
.........
वाचली.