ठाणे: मूळच्या झारखंडच्या असलेल्या मुंब्य्रातील एका दाम्पत्याने चार मुलांनंतर झालेल्या दीड वर्षांच्या लबिबा या मुलीचा खून करून मृतदेह परस्पर दफन केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. पोलिसांना आलेले निनावी पत्र, शवविच्छेदनाचा अहवाल आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून नुरानी (२८) आणि जाहिद शेख (३२) या दाम्पत्याला अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी गुरुवारी दिली.
मुंब्रा पोलिसांना अलीकडेच एक निनावी पत्र मिळाले होते. त्यानुसार एका दाम्पत्याने त्यांच्या १८ महिन्यांच्या मुलीचा खून करून मृतदेह परस्पर पुरल्याची माहिती होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे आणि पोलिस निरीक्षक संजय दवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार केली. तपासात यातील मुलीचा फोटो, तिच्या डोक्यावरील जखमा आणि तिचे मृत्यू प्रमाणपत्रही खरे होते. मात्र, हे पत्र पाठवणारी व्यक्ती आणि तिचा पत्ता बनावट होता. अर्जानुसार १८ मार्चला मुलीचा खून झाला असून १९ मार्चला तिला मुंब्य्रातील एस. एम. व्हॅली भागातील सुन्नी कबरस्तानमध्ये दफन केल्याचीही माहिती दिली. त्यानुसार या कबरस्तानातून लबिबा (१८ महिने) या मुलीचा मृतदेह बाहेर काढून कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शवविच्छेदन केले. या अहवालातही तिच्या डोक्याला अनेकवेळा मारल्याच्या खुणा आढळल्या.
त्वचेचा आजार असल्याचे भासवलेदरम्यान, या मुलीच्या आई-वडिलांकडे चौकशी केली असता, त्यांना दोन मुले आणि तीन मुली अशी पाच मुले असल्याची माहिती दिली. त्यातील मोठी हबिबा (४) तर लहान लबिबा असून या दोघींनाही त्वचेचा आजार असल्याचे या दोघांनी भासविले. मोठ्या मुलीलाही डोक्यावर अशाच जखमांसारखा आजार झाला होता. तिलाही असेच आपोआप कापल्यासारखे झाले होते. त्यामुळे तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार केले होते. त्यात मोठ्या मुलीचा आजार बरा झाला. पण लहान मुलीचा बरा झालाच नाही. यासाठीच तिला आधी अल्मास रुग्णालयात दाखल केले नंतर मेलफोर्ड या खासगी रुग्णालयात न्यूमोनियाच्या आजारावर उपचार केले. तिच्या डोक्यावरील पट्टीबाबत मात्र ती खेळताना घरात पडल्यामुळे तिला लागल्याचा त्यांनी बहाणा केला. प्रत्यक्षात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
आरोपींना १५ पर्यंत पोलिस कोठडीमृतदेह दफनभूमीतून बाहेर काढल्यापासून ते रुग्णालयातील चौकशी आणि पीएमचा अहवाल मिळेपर्यंत मुलीच्या आई-वडिलांकडून पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे आणि माहिती मिळाली. झारखंड भागात मुलीच्या लग्नात माेठा हुंडाही द्यावा लागतो, अशीही माहिती समोर आली. याप्रकरणी परिस्थितीजन्य पुरावा आणि पीएम अहवालाच्या आधारे नुरानी आणि तिचा पती जाहिद शेख या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. सखोल चौकशीअंती दोघांनाही १० एप्रिलला अटक केल्याचे पोलिस निरीक्षक दवणे यांनी सांगितले. दोघांनाही १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहेत.