सदानंद नाईक उल्हासनगर : गंगोत्री यांच्या बंगल्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावर गंभीररीत्या जखमी अवस्थेत पडलेल्या अर्जुन काळे नावाच्या तरुणांचा २० मे रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृत्यूला गंगोत्री कारणीभूत असल्याचा आरोप ओमी कलानी यांनी केल्याने, कलानी व भारत गंगोत्री यांच्यात सामना रंगला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ भाटिया चौकात १७ मे रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान अर्जुन काळे नावाचा तरुण जखमी अवस्थेत पडलेला होता. राष्ट्रवादी पक्षाचे नेते भारत गंगोत्री यांना याबाबत माहिती मिळाल्यावर, त्यांनी घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्जुन काळे याला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तब्येत खालावल्याने, पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. २० मे रोजी सकाळी अर्जुन यांचा मृत्यू झाला. मयत अर्जुन काळे याच्या नातेवाईकांनी अर्जुनला गंगोत्री यांच्या माणसांनी मारहाण केल्याने, मृत्यू झाला. असा आरोप झाला. तर अर्जुन यांनी कोणाचा तरी मोबाईल हिसकावून पळून जात असतांना भाटिया चौकात अपघात होऊन त्यामध्ये अर्जुन जखमी झाल्याचे, भारत गंगोत्री यांचे म्हणणे आहे.
दरम्यान भारत गंगोत्री यांचे एकाच पक्षातील राजकीय विरोधक ओमी कलानी यांनी मात्र गंगोत्री यांच्यावर अर्जुन काळे प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली. मयत अर्जुन काळे यांचे आई-वडील, गर्भवती पत्नी यांनी कलानी यांच्याकडे न्यायाची व कारवाईची मागणी केली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी अर्जुन याचा अपघात आहे की दुसरा प्रकार त्याच्या सोबत घडला याचा तपास करीत असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे यांची तपासणी केली जात असल्याची माहिती पोलीस अधिकारी गायकवाड यांनी दिली. एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा गंगोत्री व कलानी सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे.
अर्जुन काळे याची हत्या अर्जुन काळे याला मारहाण झाल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पत्नी व आई-वडिलांनी केला. जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही. तो पर्यंत अर्जुनवर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. तर अर्जुन याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे गंगोत्री यांचे म्हणणे आहे.