उल्हासनगर: बर्थडेला न आल्याच्या रागातून मित्राने पोटात चाकूने वार केलेल्या प्रदीप वर्मा या तरुणांचा मंगळवारी मृत्यू झाला. मुलांच्या खुन्याला अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा वडीलासह नातेवाईकांनी घेतल्याने, शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२ हनुमाननगर पाण्याच्या टाकी परिसरात रामबाबू वर्मा हे कुटुंबासह राहतात. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान त्यांचा प्रदीप नावाचा मुलगा घराबाहेर उभा असतांना ओळखीचा मित्र लोलो उर्फ सोहेल खान याने बर्थडे पार्टीला आला नाही, या रागातून प्रदीप वर्मा या तरुणांच्या पोटावर चाकूने वार केले. तसेच त्याला कोणी बचावासाठी आलातर, मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली.
याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी प्रदीप यांच्यावर प्रथम मध्यवर्ती रुग्णालयात उपचार केल्यानंतर, खाजगी रुग्णालयात हलविले. १९ दिवसांच्या झुंजीनंतर मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकारने परिसरात संताप व्यक्त होत आहे. वडील रामबाबू यांच्यासह नातेवाईकांनी जो पर्यंत पोलीस आरोपीला अटक करीत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला.
तसेच उपचारावर ७ ते ८ लाख रुपये खर्च करूनही मुलगा न वाचल्याची खंत वडील रामबाबू वर्मा यांनी व्यक्त केली आहे. वाढदिवसाला आला नाही यारागातून ओळखीच्याच मित्राने प्रदीप वर्मा या तरुणांचा खून केल्याने, गुन्हेगारीच्या संख्येत वाढ झाल्याचे उघड झाले. उल्हासनगर पोलीसांनी घटनेच्या १९ दिवसानंतरही मुख्य आरोपीला अटक केली नसल्याने, सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.