लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : श्रीराम नगर परिसरात २३ ऑगस्टच्या रात्री चोरीच्या उद्देशाने बांधकाम ठेकेदाराची गळा कापून झालेल्या हत्येचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाला यश आलं आहे. आरोपीला कोणताही धागादोरा नसताना वाराणसी येथून ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
श्रीराम नगरच्या घरत वाडी येथील जोगेंद्र यादव चाळीत प्रमोदकुमार उर्फ कतवारू बिंद (५१) यांची गळ्यावर धारदार चाकूने वार करून हत्या केलेला मृतदेह २४ ऑगस्टला सकाळी राहत्या घरात आढळून आला होता. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. सदर घटनेची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्ह्याचा उलगडा करण्याचे गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाला आदेश दिले होते.
गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी समीरकुमार ऊर्फ समशेर बिंद (२३) याला एसटीएफच्या मदतीने वाराणसी येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केल्यावर आरोपीने २६ हजार रुपयांसाठी जबरी चोरी करण्याच्या उद्देशातून प्रमोदकुमार यांचा खून केल्याची कबूली दिली आहे.
समीरकुमारला होता जुगाराचा नाद
आरोपीला जुगार खेळण्याचा नाद होता. त्याने जुगार खेळण्यासाठी ३५ हजार रुपयांना दुचाकी गहाण ठेवली होती. ते पैसेही जुगारात उडवले होते. आता घरच्यांना काय सांगायचे याच उद्देशाने प्रमोदकुमारकडून पैसे मिळतील यासाठी सुरतवरून हत्येच्या दिवशी त्यांच्या घरी आला. रात्री सोबत जेवून करून एकत्र झोपले. त्याने झोपल्यावर चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केला. पेटीतून २६ हजार रुपये चोरून नेले व ते पैसेही जुगारात हरला.
दरम्यान, आरोपीला आता अटक करण्यात आली असून सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सपोनि सोपान पाटील, पोउपनिरी उमेश भागवत, ज्ञानेश्वर आव्हाड, सफौ. अशोक पाटील, पोहवा मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, मनोज तारडे, तुषार दळवी, आतिश पवार, मसुब प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे तसेच सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे.