अंबरनाथ : अंबरनाथच्या चिखलोली धरणाच्या काठावर धुळवडीच्या दिवशी आढळलेल्या आनंद मुकुंदे या तरुणाच्या मृतदेहाचा पंचनामा करुन पोलिसांनी बुडून मृत्यू झाल्याची नोंद केली. या तरुणाची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला असतानाच पोलिसांनी खोटा पंचनामा करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजप आ. गणपत गायकवाड यांनी केला आहे.मुकुंदे हा कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा परिसरात राहणारा आहे. २९ मार्च रोजी मित्रांसोबत अंबरनाथच्या धरणावर जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला. मात्र, तो घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्या कुटुंबीयांनी मिसिंगची तक्रार नोंदविली. मात्र, त्यानंतर त्याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. मुकुंदे याचा मृतदेह पाहिला असता त्यावर मारहाणीच्या खुणा असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. मात्र, पोलिसांच्या पंचनाम्यात आणि पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये याचा उल्लेख नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा हत्येचा प्रकार असला तरी पोलीस आणि डॉक्टर्स मिळून तो दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे, २९ मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजता मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता पोस्टमॉर्टेम उरकण्यात आले. वास्तविक ज्या मृतदेहाची ओळख पटली नसेल त्याचे पोस्टमॉर्टेम तीन दिवसांनी केले जाते, असा कुटुंबीयांचा दावा आहे. ही बाब आ. गायकवाड यांच्या कानावर कुटुंबीयांनी घातली असता गायकवाड यांनी मध्यवर्ती रुग्णालयात जाऊन डॉक्टर्स आणि पोलिसांची हजेरी घेतली. परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली. ज्या मित्रांसोबत आनंद हा चिखलोली धरणावर गेला त्या तीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मृत मुकुंदे याचं मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा पोस्टमॉर्टेम करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून मृतदेह मुंबईला पाठविला आहे.
चिखलोली धरणाच्या काठावर आढळलेल्या तरुणाची हत्या? गणपत गायकवाड यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 4:59 AM