उल्हासनगर : मोबाइल व इअर फोन घेतल्याच्या क्षुल्लक कारणावरून ज्ञानेश्वर सोनावणे या तरुणांची निर्घृण हत्या झाल्याचे शनिवारी सकाळी उघड झाले असून पोलिसांनी सूरज शिंदे याला अटक केली. सलग दुसऱ्या दिवशी शहरात खुनाची घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन खुनातील आरोपीला अटक केल्याची माहिती दिली.
उल्हासनगरात बलात्कार, हाणामारी, चोरी व खुनाचे सत्र सुरू असताना शनिवारी सकाळी साडेसात वाजता कॅम्प नं. ४ सुभाष टेकडी परिसरातील भरतनगर येथील सोग्यांची वाडीच्या रस्त्यावर एका तरुणाचा खून झाल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली. ती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला. मृतदेह हा रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर सोनवणे यांचा असल्याचे उघड झाल्यावर तपास सुरू केला. आदल्या दिवशी शुक्रवारीही बंगलो परिसरातील रस्त्यावर भरदुपारी दोन वाजता सुशांत ऊर्फ गुड्या गायकवाड या तरुणाचा एका टोळक्याने खून झाल्याची घटना उघड होऊन पोलिसांनी काही तासांत पाच आरोपींना अटक केली. मात्र, या प्रकारने शहरात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हे निर्माण झाले. यापूर्वी बलात्काराच्या तीन घटनेने शहर ढवळून निघाले आहे.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हा खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी तपासाची चक्रे जलद फिरवून मृत ज्ञानेश्वर सोनावणे यांच्यासोबत आदल्या दिवशी कोण कोण होते. याचा तपास करून उल्हासनगर स्टेशन परिसरात राहणाऱ्या सूरज शिंदे याला अटक केली. पोलीस खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली असून मोबाइल व इअर फोनच्या वादातून चाकूने खून केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी काही तासांत आरोपीला अटक केली असली तरी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. हाणामारी, फसवणूक, लुटणे, बलात्कार, चोरी व खुनाच्या घटना सत्राने शहरातील वातावरण ढवळून निघून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.