ठाणे : थंड पाणी घरी आणण्यास सांगून तीन वर्षीय पीडित बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नवी मुंबईतील मोहमद गुलजार मोहम्मद इस्माईल (३०) या नराधमाला ठाणे विशेष न्यायाधीश (पोक्सो कायदा) आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश अ एन सिरसीकर यांनी गुरुवारी दोषी ठरवून दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.अशी माहिती सरकारी वकील विजय मुंडे यांनी दिली. हा प्रकार १७ मे २०१८ रोजी नवी मुंबईत घडला होता.
आरोपीने १७ मे रोजी दुपारच्या सुमारास पीडित मुलीला आपल्या घरी थंड पाणी आणण्यास सांगितले. याचदरम्यान त्याने तिच्या अत्याचार केला. याप्रकरणी २० मे २०१८ रोजी सकाळी त्याच्याविरूध्द एपीएमसी पोलीस ठाण्यात भादवि क ३७६ सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४, ६, ८, १० प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला त्याचदिवशी अटक करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. खटला न्यायाधीश अ एन सिरसीकर यांच्या समोर आल्यावर सरकारी वकील विजय मुंडे यांनी सादर केले पुरावे आणि तपासलेले ११ साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून न्यायाधीश सिरसीकर यांनी आरोपीला दोषी ठरवून दहा वर्षे कारावास आणि एक हजार रुपये अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास याला आणखी एक महिना सश्रम कारावास भोगावा लागेल असे आदेश दिले आहेत. याप्रकरणी तपास अधिकारी म्हणून तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांनी तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कावरे यांनी काम पाहिले.