- प्रज्ञा म्हात्रेठाणे - प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णांना बरे होण्यास मदत व्हावी यासाठी मनोरुग्णालयाच्या वतीने म्युझिक थेरपी सुरू केली जाणार आहे. पुण्यातील मनोरुग्णालयात हा उपक्रम सुरू असून त्या धर्तीवर येथेही हा प्रयोग करणार असल्याचे अधीक्षक संजय बोदाडे यांनी लोकमतला सांगितले.ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात सध्या १४०० हून अधिक मनोरुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. त्यांच्यासाठी विविध उपक्रम येथे राबविले जातात. त्यात भर म्हणून म्युझिक थेरपी सारखा उपक्रम मनोरुग्णालयाने हाती घेतला आहे. औषधोपचारांच्या व्यतिरिक्त म्युिझक थेरपीच्या माध्यमातून रुग्णांचा मानसीक आजार बरा करणे हा त्यामागचा उद्देश आहे. रोट्रॅक्ट क्लब आॅफ एस. के. सोमैय्या यांच्या पुढाकाराने व ताओ साऊण्ड स्पा यांच्या सहकार्याने हा उपक्रम होईल. सुरुवातीला मनोरुग्णालयातील स्टाफला ही थेरपी दिली जाणार आहे. जेणेकरुन त्यांचाही मानसिक ताण कमी होईल असे साऊण्ड थेरपीस्ट प्रिती पाटील यांनी सांगितले. स्टाफनंतर १५ मनोरुग्णांचा पायलट ग्रुप तयार केला जाणार आहे. जे मनोरुग्ण सूचना ऐकतील अशाच मनोरुग्णांना आधी ही थेरपी दिली जाईल. यात साऊण्ड हिलींग्सच्या माध्यमातून त्यांना स्पंदनांचा अनुभव दिला जाणार असून त्यासाठी वेगवेगळ्या साऊण्ड टुल्सचा वापर होणार आहे. आठ ते दहा दिवस हा प्रयोग केल्यानंतर या रुग्णांवर कसा आणि काय परिणाम होतो याची पडताळणी केली जाईल. याचा सकारात्मक परिणाम मिळाला की याच १५ रुग्णांना महिनाभर ही थेरपी पुन्हा दिली जाईल, त्यानंतर हळूहळू उर्वरित रुग्णांना यात सहभागी करून घेतले जाणार अशी माहिती त्यांनी दिली.हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर केला जाणार आहे. त्यातून काय रिझल्ट मिळतो हे पाहून नियमित थेरपी सुरू होईल.- संजय बोदाडे, अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात लवकरच म्युझिक थेरपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 4:37 AM