ठाणे : गंधार कला संस्था आणि विद्याताई पटवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने २४ मे ते २६ मे २०१९ या कालावधीत शिवसमर्थ विद्यालय येथे १० वर्षांवरील मुलांसाठी ज्येष्ठ संगीतकारअशोक पत्की यांची संगीत कार्यशाळा आयोजित केली आहे. गायनाची आवड असणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा आहे. या कार्यशाळेतून जमा होणारा निधी हा बालरंगभूमीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या विद्याताई पटवर्धन यांच्या औषधोपचारासाठी मदत म्हणून देण्यात येणार आहे अशी माहिती गंधार कलसंस्थांचे प्रा. मंदार टिल्लू यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यशाळेत अभ्यासपूर्ण गाणे कसे असावे, गाण्याचा सराव कसा करावा, गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा, गाण्याचे तंत्र, गाण्यामागची भावना, सूर, ताल यांचे गाण्यातील बारकावे या आणि अनेक विषयांचे मार्गदर्शन अशोक पत्की स्वतः करणार आहेत. २४ व २५ मे रोजी ही कार्यशाळा दुपारी ३ ते ७ व २६ मे रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेस ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेविषयी अधिक माहिती देताना अशोक पत्की म्हणाले की, माझ्याकडे जी कला आहे ती कला पुढच्या पिढी पर्यंत पोहोचावी अशी माझी इच्छा आहे. गण्यातले बारकावे तीन दिवसांत या कार्यशाळेत शिकवले जाणार आहेत. गाण्यातील फक्त चाल नाही तर त्यातील बारकावे देखील शिकावे असे पत्की यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गंधार कला संस्थेच्यावतीने २१ मे रोजी सायंकाळी ७.३० वा. गडकरी रंगायतन येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा महोत्सव होणार आहे. नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळावे या हेतूने हा महोत्सव आयोजित केला जात असतो. महाविद्यालयीन कलाकारांच्या आरपार आणि चकवा या दोन एकांकिका यावेळी सादर होणार आहे. या महोत्सवात आशुतोष बाविस्कर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ३ युवा पुरस्कार देण्यात येणार आहे. विजू माने, अभिजित चव्हाण आणि निरंजन कुलकर्णी याना हा पुरस्कार देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नाटककार अशोक सामील व आ. संजय केळकर उपस्थित राहणार आहेत.