नितिन पंडीत
भिवंडी :
देशातील मुस्लिम स्वातंत्रवीर खरे देशप्रेमी होते त्यांनी कधी ब्रिटिशांसमोर माफी मागितली नाही असे विधान एमआयएम पक्षप्रमुख असउद्दीन ओवेसी यांनी करत भाजपच्या हिंदुत्ववादी देशप्रेमावर निशाणा साधला, ओवेसी शनिवारी भिवंडीतील धोबी तलाव येथील टावरे स्टेडियमवर आयोजित जाहीर सभेत बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील ,माजी आमदार वारीस पठाण ,शहर सरचिटणीस अँड अमोल कांबळे यांसह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.
एमआयएम भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू शेख यांना दीड वर्षां पासून अटक झाली असल्याने पक्ष संघटनेला बळ देण्यासाठी कै परशराम टावरे क्रीडासंकुल येथे ओवेसी यांची सभा आयोजित केली होती. यावेळी ओवेसी यांनी भाजपा आरएसएस सह शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर सडकून टीका करताना देशातील मुस्लिमांचा संबंध मुगलां सोबत नव्हता देशात ६५ हजार वर्षात विविध देशातून पिढी येत गेली त्यामुळे हा देश हिंदू मुस्लिम यांचा नसून द्रवेडियन व आदिवासी या मूळ लोकांचा आहे असे सांगत.
शरद पवार प्रधानमंत्री यांची भेट घेऊन संजय राऊत यांना अटक करू नये अशी विनवणी करतात पण त्यांच्या पक्षातील नवाब मलिक यांच्या साठी प्रयत्न करीत नाहीत कारण ते मुस्लिम आहे म्हणून का? असा सवाल करीत भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांचे राजकीय प्रस्थ वाढत असताना त्यांना राजकारणात थोपवता येत नसल्याने त्यांच्यावर खोट्या केस दाखल करून तुरुंगात टाकले आहे .त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे.
या सभेदरम्यान भाजपा आरएसएस यांचा खरपूस समाचार घेताना देशात महागाई बेरोजगारीची समस्या भस्मासुरा सारखी वाढली असताना मोदी सरकार मंदिर मशीद वादामध्ये अडकवून ठेवत आहे असे सांगत मुगल काळा आधी सुध्दा या देशात अनेक मंदिर बौद्धविहार तोडली गेली होती याची आठवण करून देत ताजमहाल लालकिल्ला मशीद येथे सुध्दा खोदकाम करण्याची मागणी होते हे खर आहे मात्र हे खोदकाम करून भाजपा आरएसएस हे नरेंद्र मोदी यांची शैक्षणिक पात्रतेची डिग्री शोधत असल्याची उपरोधिक टीका ओवेसी यांनी केली. तर भाजप सत्तेचा आठवा वर्धापन दिन साजरा करत आहे मात्र या आठ वर्षात महागाई , बेरोजगारी, इंधन दरवाढ यासह विकासाच्या मुद्यावर भाजप बोलत नाही भाजप फक्त कलम ३७०, बाबरी मशीद , राम मंदिर, भोंगे , अजान , नकाब याच मुद्यावर बोलून देशात हिंदू मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत असेही ओवेसी यांनी यावेळी स्पष्ट केले.