नितीन पंडितलोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : रमजाननिमित्त तयार केलेली विशिष्ट जातीची कलिंगडे घेऊन विक्रीसाठी अहमदनगर येथील तरुण व प्रगतिशील शेतकरी भिवंडीत आला होता. चार ते पाच दिवस उलटूनही त्याच्याकडील कलिंगडाची विक्री न झाल्याने त्याची मेहनत वाया जाऊ नये म्हणून दहा टन कलिंगड चढ्या भावाने विकत घेऊन होतकरू शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न भिवंडीतील मुस्लिम व्यापाऱ्याने केला आहे. ही कलिंगडे खरेदी करून शेतकऱ्याला मदत करतानाच रमजान सणात हिंदू-मुस्लीम एकात्मतेची प्रचितीही दिली आहे.अहमदनगर येथील प्रगतिशील शेतकरी सूरज भालसिंग यांनी दीड एकर शेतात सात ते आठ हजार कलिंगडांची रोपे लावून पीक घेतले आहे. ही सर्व कलिंगडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविली जाणारी आहेत. आरोही आणि विशाल अशा दोन जातींची ही कलिंगडे आहेत. आरोही जातीचे कलिंगड हे वरून हिरवे, तर कापल्यानंतर पिवळे तर विशाल जातीचे कलिंगड हे वरून पिवळे तर कापल्यानंतर लाल दिसते. लॉकडाऊनमुळे कलिंगड विकायची कशी आणि कुठे या चिंतेत तो होता. रमजान महिना असल्याने भिवंडीसारख्या शहरात त्याने ही कलिंगडे अहमदनगर येथून ट्रकमधून आणली. भिवंडीतील व्यावसायिक वाहिद खान यांनी या शेतकऱ्यांची विचारपूस केली. सूरज याने शेतीत नवा प्रयोग म्हणून नव्या जातीचे पीक घेतले हाेते. खान यांनी त्याच्याकडील सर्व दहा टन कलिंगड खरेदी केली. सूरज यांना ९० ते ९५ हजार भाव अपेक्षित असताना खान यांनी दोन लाखाहून अधिक रक्कम देऊन खरेदी केली.
गरीब, पोलीस कर्मचाऱ्यांना देणार मोफत लॉकडाऊनमुळे त्याच्या मालाची विक्री होत नसल्याने मी सर्व कलिंगड खरेदी केली. माझ्या या छोट्याशा मदतीने त्याच्या चेहऱ्यावर हसू आले यातच मला समाधान मिळाले. तरुणांनी शेतीकडे वळावे यासाठी माझा हा प्रयत्न आहे. सध्या पवित्र रमजान सण सुरू आहे, त्यातच कोरोनामुळे शहरात पोलीस दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे ही सर्व कलिंगड मी गरीब गरजूंना व पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत वाटप करणार अशी प्रतिक्रिया व्यावसायिक वाहिद खान यांनी व्यक्त केली.