महात्मा फुलेनगर येथील घटना: पोलिसांनी केला सत्कारठाणे: एकीकडे भोंगे आणि चालीसा वाजविण्यावरुन राजकारण सुरु असतानाच ठाण्यातील कळवा भागातील मुस्लीम बांधवांनी गुरुवारी अनोखा आदर्श घालून दिला. जातीय सलोखा टिकविण्यासाठी तसेच कोणताही सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी महात्मा फुले नगर येथील मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेत पोलिसांच्या उपस्थितीमध्ये मशिदीवरील भोंगे उतरविल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी मौलवींची बुधवारी बैठक घेतली. या बैठकीला महात्मा फुलेनगर येथील मशिदीचे विश्वस्तही उपस्थित होते. आपण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत असल्याचे सांगत गुरुवारी सकाळी ११ वाजता भोंगे स्वत:हून उतरविणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर गुरुवारी सकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या उपस्थितीत मलंग गोकाक, फैयाज गोकाक, कादर बिजपुरे आणि इब्राहीम शेख यांनी स्वत: मशिदीवरील तीन भोंगे उतरविले. मुस्लीम बांधवांनी स्वत: पुढाकार घेऊन कायद्याचे पालन केल्याने या उपक्रमाचे पोलीस उपायुक्त अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त आंधळे आणि निरीक्षक आव्हाड यांच्यासह पोलिसांनी कौतुक केले. या उपक्रमाबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी मशिदीच्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. असाच आदर्श स्वत:हून सर्वांनी घ्यावा, असे आवाहनही यावेळी आव्हाड यांनी केले.
२४ वर्षे जुनी मशीदया मशिदीचे बांधकाम २४ वर्षांपूर्वी झाले. पूर्वी ती हरदासनगर येथे होती. पुनर्वसनाच्या वेळी मुरादभाई सोलापूर यांच्या नेतृत्वाझाली ती महात्मा फुलेनगर येथे उभारण्यात आल्याचे फैयाज गोकाक यांनी सांगितले. जातीय सलोखा टिकविण्यासाठी मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे कळवावासियांकडून कौतुक केले जात आहे.