मीरारोड - नोटबंदी देशाच्या ७० वर्षातले सर्वात मोठे चुकीचे धोरण होते. नोटबंदीमुळे सर्वसामान्यांचा फायदा झाला नाही तर अंबानी, अदानींचा फायदा झाला. जिओचे फोन हे चीन मधून आले कसे ? नोटबंदी आधी त्यासाठी हवाल्याने पैसे पाठवले गेले. चौकीदारच चोर असून देशाचं वाटोळ करायला निघाले आहेत. नोटबंदी म्हणजे सामान्य जनतेचा खून होता असा घणाघात काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी भार्इंदर येथे नोटबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसने केलेल्या आंदोलनात भाजपा व मोदी सरकारवर केला आहे.
नोटबंदीला दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या निषेधार्थ हुसेन यांच्या नेतृत्त्वाखाली भार्इंदर पुर्वेच्या काँग्रेस कार्यालयापासुन गोडदेव नाक्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. भटजी आणून शास्त्रोक्त पध्दतीने मोदी सरकारचे श्राध्द घालण्यात आले. जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, गटनेने जुबेर इनामदार, महिला जिल्हाध्यक्षा लिलाताई पाटील, नगरसेवक राजीव मेहरा, नगरसेविका गीता परदेशी, सारा अक्रम सह अॅड. शफिक खान, विकास म्हात्रे, अंकुश मालुसरे, राजकुमार मिश्रा, संदिप चौहान, प्रकाश नागणे आदी अनेक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
नोटबंदीच्या दोन वर्षानंतर सुध्दा सामान्य जनता, लहान उद्योजक-व्यापारी सर्वच वाईट परिस्थितीमध्ये आहेत. रोजगार, नोकऱ्या, व्यवसाय बुडाले. लोकांचे बळी गेले. दिवाळी त्यांची काळी ठरली आहे. कर्जबाजारी अनिल अंबानीला कागदाचे विमान बनवण्याचा अनुभव नसताना मोदींनी देशाच्या संरक्षणासाठी राफेल विमान बनवण्याचे कंत्राट दिले. हजारो कोटींचा हा घोटाळा असताना केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाला सुध्दा विमानाची किंमत सांगायला तयार नाही. ४ वर्षात सत्ता असून राम मंदिर बांधले नाही आणि निवडणुक आल्यावर राम मंदिरचा मुद्दा उभा करुन तेढ वाढवतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत येतात. काँग्रेस शासनाने मंजुर केलेल्या मेट्रोचे नारळ फोडतात. मीरा भार्इंदरसाठी ७५ दशलक्ष पाणी काँग्रेसने मंजुर केले. त्याचे श्रेय घेता पण आजही त्यातले ३५ दशलक्ष लिटर पाणी सुध्दा आणता आले नाही. २४ तास पाणी देण्याचे फलक लावले आज लोकांना ४८ तासांवर पाणी मिळत आहे. आज पालिकेच्या कामांमध्ये २८ टक्के कमिशन खात आहेत. मोठा भ्रष्टाचार चालला आहे. शहरात फेरीवाले सुध्दा भाजपाने वाढवले. २०१२ मध्ये साडे तीन हजार फेरीवाले होते ते आज १८ हजार झाले आहेत. बाजार वसुली करणारे पण भाजपाचेच आहेत अशी टिकेची झोड उठवत खोटी आश्वासनं देणं, कमिशन खाणं हेच यांचे धंदे असल्याचा आरोप हुसेन यांनी केला.